घरीच वेश्या व्यवसाय
करवीर:पत्नीचा असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पतीस आज अटक करण्यात आली. करवीर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडून आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांकडून सांगण्यात आले की, पत्नीचा असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिचा अनैतिक व्यापार करून ग्राहकांना पुरवत असल्याबाबत माहिती पोलिस मुख्यालयाला मिळाली होती. पोलिसांनी आज दुपारी पंचांसमक्ष छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी पीडित महिलेची सुटका करण्यात आली. तसेच २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातील २७ हजार वीस रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. यामध्ये भाडेकरू मूळचा कर्नाटक राज्यातील असून ‘ओएलएक्स’ वरील जाहिरात पाहून घर भाड्याने घेऊन असे अनैतिक कृत्य करत असल्याबाबत चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, घर भाड्याने देताना भाडेकरूंची माहिती घ्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘घर भाड्याने देताना संबंधिताचे ओळखपत्र किंवा आधारकार्डची प्रत घ्यावी. भाडेकरूचे संपूर्ण नाव, नातेवाईकांची माहिती व मोबाईल क्रमांक यांची माहिती घ्यावी. तसेच भाडेकरू कोणत्या प्रकारचे काम करतो, याचीही सविस्तर माहिती घ्यावी. त्याचबरोबर भाडेकरूची सविस्तर माहिती जवळच्या पोलिस ठाण्यास द्यावी.’