नगर : चुलत भावांनीच आखला दरोड्याचा ‘प्लॅन’!
शहरातील टिळक रोड भागात राहणार्या डॉ.अरुण वैद्य यांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणार्या सहा दरोडेखोरांपैकी दोघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली.
डॉ.वैद्य यांच्या घरावर टाकलेल्या दरोड्यामागे डॉ. वैद्य यांच्याकडील नोकर व त्याचा चुलत भाऊ मास्टरमाईंड निघाले. या दोघांनी इतर सराईत गुन्हेगारांच्या मदतीने दरोड्याचा प्लॅन आखत सुमारे 21 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला होता. आरोपींकडून 1 लाख 70 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आकाशसिंग रघुविरसिंग जुन्नी, सागरसिंग जुन्नी (र . संजयनगर, काटवन खंडोबा, नगर) अशी गजाआड केलेल्या दोघांची नावे आहेत. टिळक रस्त्यावरील डॉ.अरुण वैद्य यांच्या वर्धमान रेसिडेन्सी येथील प्लॅटवर बुधवारी (दि.15) सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत 28 तोळे सोन्याचे दागिने व दहा लाख रोख असा 21 लाख 20 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. एलसीबीने गुन्ह्याची उकल करण्यासाठी खबर्यांकडून माहिती घेतली असता गुन्ह्याचा मास्टरमाईंड डॉ.वैद्य यांच्या घरी काम करणारा नोकर आकाशसिंग हाच असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने आरोपी आकाशसिंग याला माळीवाडा वेस येथून अटक केली.
गुन्ह्यात चोरीला गेलेल्या ऐवजापैकी 73 हजार 570 रुपयांचे सोन्याचे दागिने व 97 हजाराची रोकड असा 1 लाख 70 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंढे, उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के यांनी ही कामगिरी केली.
प्री-प्लॅनिंग करून टाकला दरोडा
घराचे काम सुरू असल्याने घरातील सामानाची शिफ्टींग करण्याचे डॉक्टरांनी नोकर आकाशसिंग याला सांगितले होते. सामानाची शिफ्टींग करीत असताना आकाशसिंग व त्याचा चुलत भाऊ सागरसिंग यांनी सोन्याचे व हिर्याचे दागिने तसेच रोख सुटकेसमध्ये भरताना डॉ.वैद्य यांच्या पत्नीला पाहिले होते. त्याची माहिती त्यांनी नात्यातील करणसिंग टाक (रा. आष्टी, जि.बीड) याला दिली होती. त्यानंतर करणसिंग याच्या मदतीने इतर पाच जणांनी दरोडा टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले.
वेशांतर करून मास्टरमाईंड ताब्यात
दरोड्यातील मास्टरमाईंड सागरसिंग जुन्नी हा लग्न समारंभाकरीता आला असून काटवन खंडोबा येथील म्हसणवाटा येथे लपलेला असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. एलसीबीच्या पथकातील सहायक फौजदार राजेंद्र वाघ व इतर अंमलदारांनी वेशांतर करून काटवन खंडोबा भागातून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.