लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत पत्नीचा खून
रगुती वादात एकाने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत तिचा खून केल्याची घटना गंगापूर राेडवर शिवाजीनगरमधील पाझर तलावाजवळील झाेपडपट्टीत सोमवारी (दि.
२०) घडली. पतीच्या मारहाणीत मीरा पिनू पवार (४०) हिचा मृत्यू झाला आहे. काम करताना पत्नी खाली पडल्याचा बनाव पतीने केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात खुनाचा प्रकार उघड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार दाम्पत्यामध्ये सोमवारी रात्री 8 च्या सुमारास वाद झाला होता. संशयित पिनू सोमनाथ पवार (४४, रा. शिवाजीनगर, सातपूर, मूळ रा. सुरगाणा) याने दारू पिऊन पत्नी मीरासोबत वाद घातला होता. पत्नीला दांडक्याने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. मीराला रुग्णालयात दाखल करताना पिनूने पत्नी काम करताना पडल्याने तिला मार लागल्याचे सांगितले होते. मात्र गंभीर दुखापत झाल्याने मीराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मीराचे शवविच्छेदन केले. त्यात वर्मी वार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यावर गंगापूर पोलिसांनी तपास करून पिनूकडे चौकशी केली. त्यानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आला. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पिनूला अटक केली आहे. पोलिस तपासात पिनूला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे समोर आले असून पवार दाम्पत्यास दोन मुली व मुलगा आहे. मुलींचे विवाह झाले असून मुलगा आई-वडिलांसोबत राहात होता. रोजगारासाठी ते नाशिकला आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.