सोलापूरमध्ये 20 लाखांचे चंदन जप्त; तीनजणांना अटक; वन विभागाची कारवाई
दनाची लाकडे चोरून नेणाऱया तिघांना अटक करण्यात आली असून, 20 लाख रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ते कंदलगाव या मार्गावर वन विभागाने ही कारवाई केली आहे.
हिरप्पा परशुराम भोसले, परशुराम द्दुबळी भोसले (रा. घाडगेवस्ती, खर्डे, ता. पंढरपूर), रमेश चनप्पा भोसले (रा. मंगळवार पेठ, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ते कंदलगाव या मार्गावर बोलेरो पिकअप वाहनातून चंदनाची लाकडे अवैधरीत्या तोडून घेऊन निघाल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकाऱयांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून या गाडीची तपासणी केली असता, यात सुमारे 20 लाख रुपये किमतीचे चंदनाचे लाकूड आढळले. वन विभागाने ही लाकडे ताब्यात घेतली असून, हिरप्पा भोसले, परशुराम भोसले, रमेश भोसले या तिघांना अटक केली आहे. चंदनाच्या लाकडासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्यावर वनअधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, शशिकांत सावंत, शंकर कुताटे, तुकाराम चांदणे, अनिता शिंदे, गंगाधर कणबस, कृष्णा निरवणे, आनंद भडकवाड, नितीन चराटे यांनी ही कारवाई केली आहे.