शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
आष्टीत शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन,
शाळा, महाविद्यालयांनी ऐतिहासिक शस्त्र पहाण्यासाठी केली तोबा गर्दी
आष्टी : शहरात छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्त आठ दिवसापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि.१६-१७ फेब्रुवारी रोजी आष्टीत तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था पुणे या संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हातळलेले व त्यांच्या काळातील असलेल्या वस्तु प्रदर्शनास सुरूवात झाली असून हे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज मिञमंडळ चौक आष्टी यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.
आष्टी शहर शिवजंयती महोत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसापासून विविध उपक्रमांची आयोजन करण्यात आले आहे या मध्ये गुरूवार दि.१६ फेब्रुवारी व शुक्रवार दि.१७ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय छ.शिवाजी महाराजांनी वापरलेले शस्ञ व त्यांच्या काळातील साहित्यांचे प्रदर्शन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भरविण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे बीड जिल्हा सरचिटणीस अजय धोंडे व युवा नेते सागर धस यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी माजी जि.प.सदस्य खंडू जाधव, सरपंच राधेश्याम धस, सुनिल रेडेकर,ज्योतीबा रेडेकर यांच्यासह आदी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.पहिल्या दिवशी गुरूवारी शहरातील शाळा व महाविद्यालयाने तसेच नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासून मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.तरी या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे अवाहन छ.शिवाजी महाराज चौक मिञमंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणादायी व आदर्शवत आहे यासाठी या शास्त्राचे प्रदर्शन हे देश तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये व शाळेमध्ये सर्व विद्यार्थी व तरूण पिढीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे.
रविंद्र जगदाळे
अध्यक्ष – शस्त्र – युद्धकला इतिहास अभ्यासक, लेखक व व्याख्याते