भूकंपाने पृथ्वीचे दोन तुकडे! भूकंप वैज्ञानिक डोगन पेरिनेक यांनी पुन्हा एकदा तुर्कीला धोका असल्याचा इशारा दिला
तुर्की आणि सीरियामध्ये मागील सोमवारी पहाटे (Earthquake) आलेल्या भीषण अशा भूकंपाने पृथ्वीचे दोन तुकडे झाल्याचा दावा जॉन हॉपकिन्स विद्यापीठातीलप्राध्यापक स्टीव्ह हँके यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रा. स्टीव्ह हँके यांनी म्हटले की, तुर्कीमध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे 100 फूट खोल आणि 650 फूट रुंद अशी विशाल दरी निर्माण झाली आहे. अतिशय शक्तिशाली धक्क्यांनंतर तुर्कीमधील स्थिती अतिशय खराब असून, मृतांचा आकडा तासांगणिक वाढत आहे. धक्कादायक म्हणजे, या देशातील पाच ते सहा दिवसांतील (Earthquake) भूकंपाच्या धक्क्यांची एकूण तीव्रता 500 अणुबॉम्ब इतकी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पुन्हा एकदा धोका
6 फेब्रुवारी रोजी आलेल्या 7.8 तीव्रतेच्या (Earthquake) भूकंपात आज रविवारी मृतांची संख्या 31 हजारांवर पोहोचली आहे. संयुक्त राष्ट्राच्या मदतकार्य विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे भूकंप वैज्ञानिक डोगन पेरिनेक यांनी पुन्हा एकदा तुर्कीला धोका असल्याचा इशारा दिला आहे.