खेळता-खेळता झाली होती बेपत्ता पाणीटाकीत आढळला बालिकेचा मृतदेह
नागपूर : घरातून संशयास्पद अवस्थेत बेपत्ता झालेल्या आठ वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
ही घटना बेलतरोडी ठाण्यांतर्गत बेसामध्ये घडली आहे.
ज्योती साहू (वय ८) असे मृत बालिकेचे नाव आहे. ज्योतीला बोलता येत नव्हते. तिचे आईवडील मूळचे छत्तीसगडमधील राजनांदगावचे रहिवासी आहेत. नागपुरात ते मजुरी करतात. त्यांना चार मुली आहेत. दोन मोठ्या मुली राजनांदगावला आजी-आजोबाजवळ राहतात; तर ज्योती आणि तिची मोठी बहीण १२ वर्षांची राधा आईवडिलांसोबत राहते. गुरुवारी सकाळी साहू दाम्पत्य मजुरीसाठी गेले होते. ज्योती आणि राधा घरी एकटाच होत्या. दुपारी तीन वाजता ज्योती आणि राधा घरासमोर खेळत होत्या. त्यावेळी राधा बदाम तोडण्यासाठी घरात गेली. ती बदाम तोडून बाहेर आली असता तिला ज्योती दिसली नाही.
ज्योती मुकी असल्यामुळे राधा तिला परिसरात शोधत होती; परंतु ती कोठेच न आढळल्यामुळे तिने शेजाऱ्यांकडे विचारणा केली. शेजाऱ्यांनी ज्योतीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घरी पोहोचून मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता बेलतरोडी ठाण्यात पोहोचून तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेऊनही ज्योती कोठेच आढळली नाही. शुक्रवारी राजू साहू मुलीला शोधत होते. त्यांच्या घरासमोर मैदान आहे. या मैदानात एक टाकी आहे. त्यात पावसाचे पाणी जमा झालेले आहे. टाकीवर झाडे वाढलेली असल्यामुळे ती दिसत नाही. राजूने टाकीत लाकूड टाकून शोधण्याचा प्रयत्न केला असता लाकडात मच्छरदाणी अडकली. ती ओढल्यानंतर राजूला मुलीचा मृतदेह दिसला. त्याच्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह मेडिकलला पाठविला. ज्योती खेळता-खेळता टाकीजवळ पोहोचली. टाकीवर झाडे असल्यामुळे तिला टाकी दिसली नाही. त्यामुळे टाकीत पडून तिचा मृत्यू झाला. मैदानात परिसरातील मुले खेळतात. बहुतांश मुलांना टाकीची माहिती आहे. ज्योतीलाही टाकी असल्याचे माहीत होते. तरीही ती टाकीत पडल्यामुळे या घटनेकडे संशयाच्या नजरेतून पाहण्यात येत आहे. बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.