अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची घाटात उडी घेत आत्महत्या
नंदुरबार : नंदुरबार येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाला व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने थेट घाटात उडी घेत आत्महत्या केली आहे.
तीन वर्षापासून मोबदला नाही, अंगणवाडीतील बालकांना पदरमोड करीत पुरविलेला पोषण आहाराची (Poshan Aahar) खर्चित रक्कम मिळाली नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्प तोरणमाळ या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांसाठी तोरणमाळ येथे मिटींग घेण्यात आली. ही मिटींग करुन गावाकडे परत येत असताना अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली.
धडगाव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापडा या पाड्यावरील अंगणवाडी केंद्रात तेथीलच रहिवासी अलका अमिताभ वळवी (३३) ही महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. तिला तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता. पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी तिला मानसिक त्रास दिला. अशा वेगवेगळ्या माध्यमातून वर्षानुवर्षे होणारा त्रास व गरीबिला कंटाळून अंगणवाडी सेविका अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत महिलेचे पती अमिताभ जोमा वळवी यांनी केली आहे.