भारतात सापडला सोन्यासह लिथियमचा खजिना, किंमत अब्ज रुपये; होणार मोठा फायदा!
भारत लिथियमची मोठ्या प्रमाणात आयात करतो,
स्मार्टफोन, लॅपटॉपपासून ते इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी आवश्यक असणारा लिथियम या दुर्मीळ खनिजाचा ५९ लाख टनांचा साठा जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात सापडला आहे. याची एकूण किंमत ३,३८४ अब्ज इतकी प्रचंड आहे.
यामुळे इलेक्ट्रिक वाहने अधिक वेगाने आणि स्वस्तात उतरवण्याच्या सरकारच्या योजनेला बूस्टर मिळणार आहे. सध्या भारत लिथियमसाठी ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनावर अवलंबून आहे.भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा (जीएसआय) हा शोध देशासाठी अत्यंत मोलाचा आहे.
भारत लिथियमची मोठ्या प्रमाणात आयात करतो. २०२० पासून लिथियम आयातीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारत लिथियम-आयन बॅटरीसाठी लागणारी ८० टक्के सामग्री चीनकडून आयात करतो.
८०% लिथियम-आयन सामग्री भारत बॅटरीसाठी लागणारी चीनकडून आयात करतो.
आगामी हंगामात सागरी उत्खनन प्रकल्प
बैठकीदरम्यान आगामी हंगामासाठीच्या (२०२३-२४) प्रस्तावित वार्षिक कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. आगामी वर्ष २०२३-२४ दरम्यान जीएसआय १२ सागरी खनिज उत्खनन प्रकल्पांसह ३१८ खनिज उत्खनन उपक्रम राबवणार आहे.
का म्हटले जाते पांढरे सोने?
– लिथियम एक चांदीसारखा पांढरा रासायनिक धातू आहे, जो खूप हलका आहे. गेल्या काही वर्षांत लिथियमचा वापर बॅटरी बनविण्यासाठी होत आहे.
– लिथियमचा वापर आता स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतच्या बॅटरीमध्ये केला जात आहे. यामुळेच जगभरातील कंपन्या लिथियमच्या मागे लागल्या आहेत.
– लिथियम हे जगाच्या ऊर्जेच्या गरजेचे भविष्य मानले जात आहे. भविष्यात, पेट्रोल-डिझेल, कोळसा या जीवाश्म इंधनांच्या घटत्या उपलब्धतेमुळेच पर्याय म्हणून जग स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत आहे.
सोन्याच्या ५ खाणीही मिळाल्या
– सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रॅमिंग बोर्डच्या ६२ व्या बैठकीत जीएसआयने लिथियम आणि सोन्यासह ५१ खनिज साठ्यांबाबतचे अहवाल राज्य सरकारांना सादर केले. यातील ५ खाणी सोन्याच्या आहेत. याशिवाय अन्य साठे पोटॅश, मॉलिब्डेनम आणि मूळ धातूंशी संबंधित आहेत.
– जम्मू- काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांत हे धातू सापडले आहेत. याशिवाय ७८९.७० कोटी टन कोळसा आणि लिग्नाइटशी संबंधित १७ ठिकाणांचे अहवालही कोळसा मंत्रालयाला सादर करण्यात आले आहेत.