वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलाने मागितले 30 लाख रुपये
आंध्र प्रदेशमधील एका वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.
या मुलाने वडिलांना अग्नीडाग देण्यासाठी चक्क पैशांची मागणी केली. यानंतर या मृत व्यक्तीच्या मुलीनेच वडिलांना अग्नीडाग दिला. वडिलांचा मृतदेह अंगणात असताना अंत्यसंस्कार करण्यासाठी (last rites of the father) मुलाने पैसे मागितल्याचा हा प्रकार पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या मुलीने घेतलेल्या भूमिकेवरुन त्याच्यावर टीका केली आहे. कोणत्याही व्यक्तीला लाज वाटेल अशी ही घटना आंध्र प्रदेशमधील एनटीआर जिल्ह्यातील पेनुगंचिप्रोलुमध्ये घडलं.
1 कोटी मिळाले पण…
मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव गिंजुपल्ली कोटाया (80) असं आहे. ते एनटीआर जिल्ह्यातील पेनुगंचिप्रोलु मधील अनिगंदलापडू गावाचे रहिवाशी होते. संपत्तीवरुन अनेकदा गिंजुपल्ली आणि त्यांच्या मुलामध्ये वाद व्हायचा. गिंजुपल्ली यांनी त्यांच्या मालकीची जमीन विकल्यानंतर त्यांना 1 कोटी रुपये मिळाले होते. यापैकी त्यांनी 70 लाख रुपये मुलाला दिले आणि बाकीचे 30 लाख रुपये (30 Lakh Rs) स्वत: जवळ ठेवले. वडिलांनी 30 टक्के रक्कम स्वत: जवळ ठेवल्याने मुलगा नाराज होता.
वडिलांनी दिली जिवे मारण्याची धमकी
गिंजुपल्ली यांचा मुलगा त्याला मिळालेल्या 70 लाखांमध्ये समाधानी नव्हता. तो अनेकदा त्याच्या वडिलांकडे उरलेले 30 लाख रुपये मागायचा. या 30 लाखांच्या मुद्द्यावरुन मुलगा अनेकदा गिंजुपल्लींशी वाद घालायचा. पैसे दिले नाहीत तर मारुन टाकेन अशी धमकीही त्याने वडिलांनी दिली होती. गिंजुपल्ली यांच्या मुलाने त्यांचा शारीरिक छळही केला. मुलाच्या छळाला कंटाळून गिंजुपल्ली त्यांच्या पत्नीबरोबर मुलगी विजयलक्ष्मी हिच्या गुम्मदीदुरु गावामध्ये निघून गेले. यानंतर हे दोघे आपल्या मुलीच्याच घरी राहू लागले.
मुलगीच करायची खर्च
गिंजुपल्ली यांच्या मुलाला त्यांच्या तब्बेतीचीही काळजी नव्हती. वडिलांच्या तब्बेतीसंदर्भातील सर्व देखभाल आणि खर्चही मुलगीच करत होती. शुक्रवारी गिंजुपल्ली यांचं वयोमानाबरोबरच किरकोळ आजारामुळे मृत्यू झाला. नातेवाईकांनी गिंजुपल्लीच्या मृत्यूची बातमी मुलाला दिली. मात्र गिंजुपल्लींच्या मुलाने वडिलांचं पार्थिव आपल्या घरात घेण्यास आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.
गावकरी म्हणाले, असा मुलगा कोणालाच मिळू नये
गिंजुपल्ली यांच्याकडील 30 लाख रुपये आपल्याला दिले तरच मी पार्थिवावर अंत्यसंस्कार करेल अशी अट त्यांच्या मुलाने घेतली. वडिलांच्या मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यासाठी 30 लाखांची ही असंवेदनशील मागणी ऐकून गिंजुपल्ली यांच्या नातेवाईकांनाही धक्का बसला. गावकऱ्यांनी तर असा मुलगा देवाने कोणालाच देऊ नये अशा प्रतिक्रियाही नोंदवल्या. मुलाने अत्यंस्कार करण्यास नकार दिल्याने अखेर गावकऱ्यांबरोबर चर्चा करुन गिंजुपल्ली यांची मुलगी विजयलक्ष्मीने वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.