बीड भावावर झालेल्या अत्याचार प्रकरणी न्याय मागण्यासाठी बहिणी आणि पत्नीचे अमरण उपोषण
भावावर झालेल्या अत्याचार प्रकरणी न्याय मागण्यासाठी बहिणी आणि पत्नीचे अमरण उपोषण
बीड :आनंद शेरू भोसले यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत आणि त्यासंबंधी इतर मागण्याच्या संदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयताच्या बहिणी आणि पत्नीने 6 फेब्रुवारी 2023 पासून अमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी रिपाईचे किसन तांगडे मानवी हक्क अभियान संघटनेचे राज्य सचिव कडुदास कांबळे, बीड जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, मानवी हक्क अभियान वडवणी तालुका अध्यक्ष विष्णू मुजमुले, धारूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मुजमुले यावेळी हजर होते.
जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,’ मयत आनंदा शेरू भोसले यांनी त्याचे राहते घरी बायकोच्या समोर दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता विषारी औषध घेतले. औषध घेताना, ‘ मला पोलीस सारखा त्रास देतात. माझ्यावर अनेक खोटे गुन्हे टाकून मला टॉर्चर केले आहे. तसेच पोलिसांनी 20 हजार रुपयासाठी तगादा लावून परेशान केले आहे. माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. अटक करून पुन्हा मारहाण करतील या भीतीने मी आज आत्महत्या करणार आहे असे विषारी औषध घेण्यापूर्वी त्यांनी त्याच्या पत्नीस सांगितले होते.,’ मयताच्या पत्नीने तसा शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे जबाब दिलेला आहे.
आनंद शेरू भोसले यांच्यावर आज पर्यंत पोलिसांनी जेवढे गुन्हे दाखल केले आहेत त्यापैकी एकाही गुन्ह्यांमध्ये त्यास शिक्षा झालेली नाही. केवळ पारधी समाजाचे असल्यामुळे पोलिसांनी संशयावरून त्रास दिलेला आहे. पोलिसांनी अनेकदा आनंद भोसले यास केवळ संशयावरून अटक करून थर्ड डिग्रीचा वापर करून अमानुषपणे मारहाण केलेली आहे. गेवराई येथील तिहेरी खूनाचे प्रकरणांमध्ये ही त्यास आरोपी केले होते. परंतु पुरावे सिद्ध न झाल्याने त्यास 169 प्रमाणे निर्दोष करण्यात आले होते.
गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस त्याला वारंवार पैशाची मागणी करत होते. म्हणून भोसले यांनी पोलिसाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणाच्या संदर्भाने गेवराई पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आनंद शिंदे भोसले यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या पोलिसाविरुद्ध तक्रार दाखल करण्यास गेवराई पोलीस टाळाटाळ करत आहेत.
जिल्हाधिकारी साहेब बीड यांना दिलेल्या निवेदनामध्ये या मागण्याचा समावेश केला आहे.
1) आनंद शिरू भोसले यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलिसांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार आणी कलम 306 भा.द.वि.प्रमाणे तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा.
2) या गुन्ह्याचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा.
3)गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि उप विभागीय पोलीस अधिकारी गेवराई आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे. 4)मयत आनंद शेरु भोसले यांच्या कुटूंबीयाचे शासकीय योजने मार्फत पुनर्वसन करण्यात यावे.
5) मयत आनंदा उर्फ वाघ्या शेरू भोसले याची पत्नी आणि नातेवाईकांचे जबाब घेण्यात यावेत.
या निवेदनावर मयताच्या बहिणी तारामती अशोक काळे, कावेरी काळे, वैशाली काळे, वैशाली शिंदे आणि मयताची पत्नी लता आनंदा भोसले यांच्या सह्या आहेत.