शहरालाही लाजवेल अशी आदर्श ग्रामपंचायत; मानधन न घेता महिला सरपंचाचा गावासाठी खर्च
बुलढाणा : गावाचा विकास तसा पाहिला तर खूप दुरपर्यंत पहावयास मिळत नाही. परंतु, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जनुना हे गाव यापासून वेगळे ठरत आहे.
अर्थात शहरालाही लाजवेत अशी ही ग्रामपंचायत (Gram Panchayat) ठरत आहे. कारण महिला सरपंच या मानधन न घेता ती रक्कम गावाच्या विकासासाठी खर्च करत आहेत.
विकास म्हटला की फक्त गुळगुळीत रस्ते, तेही फक्त शहराला जोडणारे असा आपला बघण्याचा दृष्टिकोन. स्वच्छता म्हटले म्हणजे फक्त मोठ्या कॉलनीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पण शहराच्या बरोबरीने आपली वाटचाल करणारी एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना ग्रामपंचायतकडे बघावा लागेल. ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच आपले मानधन सुद्धा गावा करता खर्च करते.
येथील महिला सरपंच सुवर्णा गोरे ह्या झाल्यापासून गावचा विकास तर होतच आहे. शिवाय गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, याकडे त्या जातीने लक्ष घालतात. शिवाय गावाच्या विकासात भर म्हणून ग्रामस्थांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. गावात अंडरग्राउंड ड्रेनेज, प्रत्येक घरात नळ, तर आता गावात आरो प्लांट पूर्णत्वास येत आहे. या महिला सरपंचामुळे जनुना गावाची विकासाकडे वाटचाल होताना दिसतेय एवढे नक्की.