ए इथे बाईक थांबव ना, कात्रज घाटात फिरायला जाताना तिचा बहाणा, 28 वर्षीय तरुण खाली उतरला अन्…

पुणेःसोशल मीडियावर ओळख वाढवून पैसे उकळण्याच्या घटना वाढत असताना पुण्यात आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री करुन तरुणाला प्रेमसंबंधांचे आमिष दाखवत, काही जणांनी एका तरुणाची आर्थिक लूट केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एका तरुणीसह चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार 28 वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याची इन्स्टाग्रामवर एका साडे सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीशी ओळख झाली. सातत्याने चॅटिंग झाल्याने दोघांमध्ये मैत्री वाढली. काही दिवसांतच तिने त्याच्याशी प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त करत त्याला कात्रज परिसरात येण्यास सांगितले.
तरुण तिच्या सांगण्यानुसार तेथे पोहोचला. थोड्या वेळ बोलल्यानंतर त्या तरुणीने कात्रज घाटाकडे फिरायला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. घाटाकडे जाताना तिने एका ठिकाणी बाईक थांबवायला सांगितले. गाडी थांबताच आधीच लपून बसलेले तिचे साथीदार अचानक त्याच्या जवळ आले.
या टोळीने त्याला धमकावत जबरदस्तीने येवलेवाडी परिसरात नेले. तिथे त्याला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर ‘तुझ्यावर POCSO चा गुन्हा दाखल करू’ अशी भीती दाखवून ७० हजार रुपये देण्याची मागणी केली. तक्रारदाराकडे रक्कम नसल्याने आरोपींनी त्याच्याकडील १० हजार रुपये हिसकावून घेतले आणि बाकीचे पैसे देण्यासाठी सतत फोन करून धमक्या देत राहिले.
अखेरीस वाढत्या त्रासाला कंटाळून तरुणाने भारती विद्यापीठ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना ताब्यात घेतला असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











