क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

आधी गोळ्या झाडल्या.. खाली पडल्यावर गळा चिरून हत्या प्रेमप्रकरणातून की प्राॅपर्टीवरुन?


व्यावसायिक अमित भोसले यांचा खून प्रेमप्रकरणातून की प्राॅपर्टीच्या वादातून झाला, याची माहिती पोलिस घेत आहेत. यातील दोन्हींपैकी एक खुनाचे कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, आरोपी सापडल्यानंतरच यातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.

सातारा : जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित आप्पासाहेब भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडल्या. यातूनही ते बचावल्याने पळताना खाली पडले.
यानंतर हल्लेखोरांनी गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना महामार्गाजवळील वाढे फाटा येथे सोमवारी रात्री एक वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमित भोसले यांचा राधिका रस्त्यावर गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री ते त्यांच्या मैत्रिणीसोबत कारमधून वाढे फाटा येथे जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांची मैत्रीण कारमध्ये बसली. या वेळी अमित हे हात धुण्यासाठी गेले असता दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हे पाहताच ते धावू लागले. मात्र, पळत असताना ते खाली पडले. हीच संधी साधून हल्लेखोरांनी त्यांचा गळा चिरला. हा प्रकार गाडीत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते. रक्तबंबाळ झालेल्या अमित भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिस, सातारा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा वाढे फाट्याकडे रवाना झाला. पोलिसांनी तातडीने वाढे फाटा परिसर पिंजून काढला. मात्र, संशयित आरोपी सापडले नाहीत.

घटनास्थळी पोलिसांना गोळी झाडल्यानंतरच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. असे असताना एकही गोळी अमित भोसले यांच्या शरीरात घुसली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. गळा चिरलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आलाय. यामध्ये नेमके काय सत्य आहे, हे तपासण्यासाठी पुणे येथे शवविच्छेदन करण्याचा निर्णय पोलिसांना घेतला असून, मृतदेह पुणे येथे नेण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button