बागेश्वर सरकार कशी ओळखतात लोकांच्या मनातील गोष्ट; समोर आलं बाबांचं सर्वात मोठं रहस्य!
रायपूर : बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री लोकांच्या मनातील गोष्टी ओळखतात, असा दावा केला जातो.
बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात संधी मिळाली तर नशीब बदलते, अशी लोकांची भावना आहे. महाराज लोकांच्या समस्या न सांगताच ओळखतात आणि त्या त्यांना सांगतात. याचवेळी ते एका कागदावर समस्येचे समाधान लिहून आपली समस्या लवकरच दूर होईल असे सांगतात.
मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील ग्राम गडमध्ये असलेले बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) देशभरात प्रसिद्ध झाले आहे. बागेश्वर धामच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि यासाठी आपला नंबरही लावतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न आहे की, बाबा लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात?
बागेश्वर सरकारचा दावा आहे, की त्यांच्याजवळ अशी शक्ती आहे की, ते लोकांच्या मनातील गोष्ट ओळखू शकतात. ते सांगतात की त्यांच्याकडे वरून कनेक्शन आहे. त्यांना वरूनच सिग्नल मिळतो. ते या सिंग्नलच्या माध्यमानेच लोकांच्या मनात काय सुरू आहे? हे ओळखतात. बागेश्वर महाराजांच्या याच शक्तींमुळे बागेश्वर धाममध्ये जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढू लागली आहे.
…पण कशी ओळखतात मनातील गोष्ट?
बागेश्वर महाराज लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात? हा एक मोठा प्रश्न आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही तज्ज्ञांचा दावा आहे की, ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर त्याच प्रकारचे भाव येत असतात, जे काही लोक समजू शकतात. जसे, दृष्टी नसलेले लोक ब्रेल लिपीच्या सहाय्याने काहीही वाचू शकतात. तसेच काही मेंटॅलिस्ट देखील असतात, जे लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतात. जगभरात असे अनेक मेंटॅलिस्ट आहेत. जे अशा पद्धतीने लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतात अथवा ओळखू शकतात.
हाव-भाव आणि शारीरिक हालचालींशिवाय, समोरच्या व्यक्तीचा व्यवहार कसा आहे? याच बरोबर त्याच्या बोलण्याची पद्धत कशी आहे? हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत असते. जर एखाद्याला मेंटॅलिस्ट आर्ट येत असेल, तर ती व्यक्तीही अशा पद्धतीने दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणू शकते. याच पद्धतीने काही लोकांकडे सम्मोहन कलाही असते, तेही लोकांच्या मनातील काही गोष्टी सहजपणे ओळखू शकतात.