घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, सहा महिन्यांच्या बाळासह 6 जण ठार
जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत (America News) बंदूक संस्कृती खूप मोठं आव्हान ठरतेय.
दिवसागणिक संपूर्ण देशभरात अनेक गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी पहाटे अमेरिकेतील प्रसिद्ध शहर असलेल्या कॅलिफोर्नियातील एका घरात घुसून काही बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात (Firing in California) सहा जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बाळासह त्याच्या आईचाही समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती देत, मृतांचा आकडाही जाहीर केला आहे.
स्थानिक माध्यमांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टार्गेटेड हल्ला होता. या हल्ल्यात सामील असलेल्या टोळीचा अंमली पदार्थ किंवा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असावा, असा संशय आहे.
सोमवारी पहाटे साडेतीन वाजता कॅलिफोर्नियाच्या जोक्विन व्हॅलीमधील टुलारे सॅन शहरातील एका घरावर दोन पुरुषांनी हल्ला केला आणि अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सहा जणांनी आपला जीव गमावला आहे.
सकाळी ज्या घरात हल्ला झाला त्यांच्या शेजारच्या व्यक्तीचा फोन आला. माहिती मिळताच सात मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेले होते आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तिथे पडलेला होते. पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला घटनास्थळी सहा मृतदेह सापडले होते. ही घटना अत्यंत अत्यंत दुःखद आहे. आम्हाला घटनास्थळावरून 6 महिन्यांच्या मुलाचं आणि त्याच्या आईचं मृतदेह आढळून आले आहेत. दोघांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात इमारतीच्या आत लपून दोन जणांनी कसा तरी आपला जीव वाचवला. तसेच, या हल्ल्यात काही लोक जखमीही झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला ड्रग्जशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. ज्या पद्धतीनं गोळ्या झाडल्या गेल्या आणि लोकांना टार्गेट करून ठार मारण्यात आलं, त्यावरून हे प्रकरण टार्गेट किलिंग असल्याचं स्पष्ट होत आहे. संपूर्ण कुटुंबाला नियोजनपूर्वक टार्गेट करण्यात आलं असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
अमेरिकेसाठी बंदूक संस्कृती ही मोठी समस्या बनली आहे. 2021 मध्ये जवळपास 49 हजार लोकांनी गोळीबारात आपला जीव गमावला. त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. देशात लोकसंख्येपेक्षा जास्त शस्त्रं आहेत. तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीकडे किमान एक बंदूक असते आणि दोनपैकी जवळपास एक प्रौढ व्यक्ती बंदूक असलेल्या घरात राहतो.