कांद्याच्या पैशाच्या वादातून एकाचा खून; दोघांना अटक
पैशाच्या वादातून अकोले तालुक्यातील जाचकवाडीचे रहिवासी असणाऱ्या दोघा जणांनी एका ५५ वर्षीय इसमाच्या डोक्यात खोरे घालून खून केलातसेच पुरावा नष्ट होण्यासाठी त्या इसमाचा मृतदेह तेथीलच टोमॅटोच्या शेतात गाडला असल्याची धक्कादायक घटना जाचकवाडी येथे समोर आली. अंकुश भाऊ लामखडे (वय ५५, रा. केळवाडी, ता. संगमनेर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी जाचकवाडीच्या दोघांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब महाले याची अंकुश लामखडे यांच्याशी ओळख झाली होती. भाऊसाहेब तथा बारकु याने जाचकवाडी शिवारात काही ठिकाणी शेती वाट्याने केली होती. तसेच अनेक शेतकर्यांचे कांदे विकत घेऊन तो माल तेथेच ठेऊन शेतकर्यांना कांद्याची रक्कम देत असे. तर,काही दिवसानंतर हे कांदे उचलून तो दुसर्या व्यापार्यांना देत असे. त्यासाठी याला काही पैसे गुंतवावे लागत होते. त्यामुळे, त्याने काही रक्कम लामखडे यांच्या कडून व्याजाने घेतली होती. तर, त्यासाठी भाऊसाहेब याने त्याचेच जवळचेच काही नातेवाईक मध्यस्ती होते. मात्र, दरम्यानच्या काळात कांद्याचा बाजार पडला, त्यामुळे त्याच्याकडे पैसे आले नाही व तो पैसे परत करु शकला नाही.
दरम्यान, जी काही मुद्दल होती. ती सोडून व्याजाची रक्कम वाढत चालली होती. त्यामुळे, लामखडे यांनी भाऊसाहेब याच्याकडे वारंवार तगादा लावला होता. आज नाही, उद्या देतो असे करुन दिलेले वायदे टळत होते. त्यामुळे, लहामखडे यांनी मागणीचा जोर वाढविला होता. तर दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ही दोघे जाचकवाडी शिवारात एकमेकांना भेटले होते. तेथे त्यांच्यात पैशांच्या करणातून वाद झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र, हा वाद विकोपाला गेला त्यातून भाऊसाहेब व त्याचा साथीदार अशोक फापाळे यांनी अंकुश लामखडे याच्या डोक्यात फावडे घालून निर्घृण खून केला.
या घटनेची माहिती कळताच पो. नि. सुनील पाटील आणि सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी भाऊसाहेब उर्फ बारकु महाले आणि अशोक फापाळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्या दोघांची कसून चौकशी केली असता, मयत व्यक्तीच्या डोक्यात खोरं मारुन त्यास टोमॅटो पीक असलेल्या एका शेतात पुरला असल्याची माहिती त्या दोघांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस तपास करण्याचे काम करत आहे.