चीनमध्ये कोरोना कहर
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221128_154847.jpg)
बिजिंग : गेल्या आठवड्यात दिल्लीतील चीनच्या दूतावासाचे द्वितीय सचिव छांग पेलिन व प्रेस कौन्सिलर वांग शावजियान भेटले. त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पांदरम्यान ते म्हणाले, “गेली दोन वर्षे आम्ही दूतावासाच्या इमारती बाहेर पडलेलो नाही.
करोनाची बंधने असल्यामुळे आम्हाला बाहेर पडण्यावर बंधने होती. ती आता भारतात बऱ्याच प्रमाणात शिथील झाली आहेत”. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे, भारतात जवळजवळ संपुष्टात आलेली करोनाची साथ.
उलट, “चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हॉटेलमध्ये सात दिवस क्वारंटाईन (विलग्नवास) केले जाते व त्यानंतरही किमान एक आठवडा घरात विलगीकरण केले जाते,” असे वांग म्हणाले. पण, गेल्या दोन दिवसात करोनाच्या बंधनांमुळे प्रधुब्ध झालेल्या लोकांच्या मागण्यांनी भलतेच वळण घेतले. ते आता अध्यक्ष शी जिनपिंग यांचा राजीनामा मागत आहेत.
उलट, भारताने विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आता मुखपट्टी अयच्छिक ठेवली असून, आरोग्य सेतूवरील नोंदणी दाखविण्याची गरज संपुष्टात आली आहे. मुखपट्टी वापरणारे दिल्लीत दिसतात, ते विरळा. या दिवसात करोनापेक्षा प्रदूषणापासून वाचण्यासाठी अनेक जण मुखपट्टी वापरत असून, त्याचा करोनाशी काही संबंध नाही. दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण अजूनही बरेच आहे. एअर क्वालिटी निर्देशांक अजूनही तीनशे ते चारशेच्या आसपास असतो. प्रत्यक्षात हा निर्देशांक पन्नासच्या खाली असेल, तरच हवा शुद्ध आहे, असे समजले जाते. बाजारपेठा, सिनेमागृहे, शाळा, कॉलेजेस, सार्वजनिक स्थळे आदी ठिकाणी दिल्लीत मुखपट्टी लागत नाही. हेच चित्र आज देशातील अनेक शहरातून दिसते. त्यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हे खरे असले, तरी करोना केव्हा डोके काढील, याची खात्री नसल्याने प्रत्येकाने आपापल्या परीने काळजी घेणे गरजेचे आहे.
भारतात करोना केसेसचा (लागण झालेल्यांचा) विद्यमान आकडा 5395 आहे. या उलट, चीनमध्ये करोनाचा कहर दिवसागणिक वाढत असून, बीजिंगहून आलेल्या वृत्तानुसार, “चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे गेल्या शुक्रवारी हा आकडा 32,695 होता.” त्यामुळे बीजिंग, शांघाय, ग्वांगझाव आदी प्रमुख शहरातील नागरी जीवन संपूर्णतः विस्कळीत झाले आहे.
चीनमध्ये कठोर असे शून्य कोविड धोरण (झीरो कोविड पॉलिसी – डायनॅमिक झीरो कोविड)) लागू करण्यात आले आहे. वरील तीन शहरात जवळजवळ लॉकडाऊन आहे. गेले दोन महिने शांघायमध्ये लॉकडाऊन होता. शांघायची लोकसंख्या अडीच कोटी आहे. जो काही थोडा वेळ नागरिकांना मिळतो, त्यात ते मोठमोठ्या मॉल्समध्ये जाऊन महिना दीड महिन्याचा किराणामाल आदी विकत घेत असल्याने तेथील मालांचे शेल्फ रिकामे होत आहेत. नवा माल येईनासा झालाय. बीजिंगहून पाठविलेल्या वृत्तात `द हिंदू’चे वार्ताहर अनंत कृष्णन यांनी म्हटले आहे, की बीजिंगमध्ये गेल्या शुक्रवारी 1860 केसेस उघडकीस आल्या. “त्यामुळे, बीजिंग `घोस्ट टाऊन’ सारखे दिसत होते.” शून्य कोविड धोरणामुळे शिंजियाग प्रांताची राजधानी उरूमची येथे घराच्या परिसरात डांबून ठेवलेल्या दहा लोकांचा जळून मृत्यू झाला, याची जोरदार चर्चा चीनमध्ये आहे. उरूमची मध्ये झालेल्या प्रक्षुब्ध निदर्शनात “झीरो कोविड धोरण रद्द करा,” ही एकमेव मागणी होती. आजारी लोकांवर वेळीच औषधोपचार करणे अशक्य झाले आहे.
शून्य कोविड धोरणातून चीनचे खुद्द राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुटले ऩाही. उझबेकिस्तानमधील समरकंद शहरात अलीकडे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन -एससीओ) शिखर परिषदेहून परतल्यावर ते सात दिवस क्वारंटाईनमध्ये होते. त्या दिवसात ते जगाला कुठेही न दिसल्याने चीनमध्ये त्यांच्याविरूद्ध लष्करी उठाव झाल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. पण ते सारे काही खोटे होते.
दिवसाकाठी केसेसचे प्रमाण साधारणतः तीस हजाराच्या आसपास असल्याने चीनच्या नेत्यांची झोप उडाली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागलाय. ही स्थिती सुधारावी यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेने तब्बल 70 अब्ज डॉलर्सचा निधी बाजारात आणला आहे. शून्य कोविड धोरणात सरकारने कोणताही बदल अथवा शिथिलता आणलेली नाही. या मागे भीती आहे, ती करोना झंझावातासारखा पुन्हा चीनमध्ये पसरला, तर अर्थव्यवस्थेव्यतिरिक्त चीनी लोकांचे इतके नुकसान होईल, की त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक अस्थिरतेला आटोक्यात आणणे सरकारला सोपे जाणार नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग गेल्या वर्षी 3.9 टक्के होता. तो 2022 मध्ये 5.5 टक्क्यावर नेण्याचे उद्दीष्ट अद्याप साध्य झालेले नाही. पसरणाऱ्या करोनामुळे अनेक उद्योग, व्यवसाय, शाळा बंद आहेत.
चीनच्या हेनान प्रांतातील झेंगझाव शहरात साठ लाख लोक राहतात. तेथे फॉक्सकॉनच्या फॅक्टरीत एपल कंपनीचे अत्याधुनिक आयफोनचे उत्पादन होत आहे. तेथे अगदी बोटावर मोजण्याइतक्या करोनाच्या केसेस होताच कर्मचाऱ्यांवर कठोर निर्बंध लादण्यात आले. शिवाय, कंपनीने कर्मचाऱ्यांना वेळीच पगार न दिल्याने असंतोषाची लाट उसळली. त्यामुळे करोनाच्या काळातही कंपनीविरूद्ध जोरदार निदर्शने होऊन उत्पादनाचे प्रमाण 30 टक्के घसरले. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांनी कंपनीला रामराम ठोकला व ते मिळेल त्या वाहनांनी गावाकडे जात आहेत. त्यातील काहींना तेथून 280 कि.मी.अंतरावर असलेल्या नानयांग शहरातील हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे.
चीनमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापिठाने प्रसारीत केलेल्या आकडेवारीनुसार, 1 मार्च 2020 ते 24 नोव्हेंबर 2022 दरम्यान कोरनाच्या केसेसचे प्रमाण केवळ 5 हजारावरून 25 हजारावर गेले. फेब्रुवारीमध्ये हाँगकाँग व दक्षिण कोरियातही परिस्थिती गंभीर होती. ओमिक्रॉनचा विषाणू पसरल्यावर त्याची साथही वेगाने पसरली व मृत्यूंचे प्रमाण वेगाने वाढले. या वर्षी चीनमध्ये दुसऱ्यांदा करोनाची साथ पसरली आहे. ओमिक्रॉनचा विषाणू डेल्टा व बेटा विषाणूपेक्षा सौम्य आहे. परंतु, चीनने आजवर 3.5 अब्ज लसीकरण करूनही 80 वयापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने त्यांच्यात करोना पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यापासून कसे वाचवायचे, या चिंतेत आरोग्यखाते आहे. `द इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये आलेल्या वृत्तानुसार, “चीनमध्ये असलेल्या सयानोव्हॅक व सायनोफार्म या लसी कितपत प्रभावी ठरतील, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.”