लहान बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच मोठ्या बहिणीने जाग्यावर प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना
लहान बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच मोठ्या बहिणीने जाग्यावर प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे घडली.
भोकरदन – लहान बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच मोठ्या बहिणीने जाग्यावर प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे शुक्रवारी (ता25) सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेनंतर दोघी बहिणींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रभागाबाई गंगाराम पैठणकर (65) व गुंफाबाई हरी वाघ (60) या दोनही सख्या बहिणी भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे रहायला होत्या. शुक्रवारी सकाळी गुंफाबाई वाघ या नेहमीप्रमाणे दुध घेऊन घरी आल्या. त्यानंतर त्यांना काहीवेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना लगेच नातेवाईकांनी भोकरदन येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांची मोठी बहीण चंद्रभागाबाई या नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना गावातील एका व्यक्तीने तुमची लहान बहीण गुंफाबाई यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांना भोकरदन येथे नेण्यात आल्याचे सांगितले. हे कळताच त्यांनी पाण्याने भरलेला हातातील हंडा खाली टाकला व त्या जागेवर कोसळल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर दुसरीकडे गुंफाबाई यांना भोकरदनहुन पुढील उपचारासाठी सिल्लोड येथे हलविण्यात येत असतांना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एकाच दिवशी व एकाच वेळी घडलेल्या या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली असून, दोघी बहिणींचे एकमेकीत किती जीव होता हे यावरून दिसून आल्याची चर्चा सर्वत्र पसरली. दरम्यान, दुपारी दोन वाजता सोयगाव देवी येथे दोघी बहिणींची एकाचवेळी अंत्ययात्रा काढून एकाच ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.