पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नागरिकांचे प्रेम आहे – अमित शहा
अहमदाबाद : निवडणुकीत उमेदवाराला महत्व तेव्हाच असते जेव्हा कमळ हे चिन्ह त्याच्यासोबत असते. मतदार हे पक्षासोबत असतात, उमेदवारासोबत नाहीत अशा शब्दांत गुजरातमधील बंडखोरांचे आव्हान भाजपचे नेते अमित शहा यांनी फेटाळून लावले आहे.
नर्मदा जिल्ह्यातील राजपीपला येथे शहा यांचा आज रोड शो झाला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ज्या ठिकाणी उमेदवार विजयी होण्याची शक्यता असते अशाच ठिकाणी सामान्यत: मोठे नेते प्रचाराला जातात. राजपीपलाची जागा भाजपने कधीच जिंकली नाही तरी तुम्ही येथे प्रचाराला कसे आलात याबाबत बोलताना शहा म्हणाले की असे काही नसते. ही जागा काही वेळा भाजपनेही जिंकली आहे.
पक्षाने आम्हाला ज्या जागांवर पराभव पत्करावा लागला आहे, त्याच ठिकाणी माझ्या सभांचे आयोजन केले आहे. पक्ष ठरवतो त्या ठिकाणी नेत्यांनी गेले पाहिजे. मागच्या वेळेपेक्षा यावेळी मोठे आव्हान दिसत नसल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की कोणतीही निवडणूक सोपी समजली जाऊ नये. प्रत्येक निवडणुकीकडे आम्ही आव्हान म्हणूनच पाहतो आणि जास्तीत जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी भाजप जागा आणि मिळणारी मते या दोन्ही गोष्टींचे रेकॉर्ड मोडणार आहे.
गुजरातची भूमी ही कायमच हिंदुत्वाची भूमी राहीली आहे. येथील नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम आहे. कॉंग्रेसने मोदींना त्यांची औकात दाखवण्याची भाषा वापरली आहे. त्याचे उत्तर त्यांना गुजरातची जनताच देईल असे त्यांनी नमूद केले.