पालिका कर्मचारी असल्याचे भासवून कारवाईच्या नावाखाली घरात घुसून महिलेची सोनसाखळी चोरली
पालिका कर्मचारी असल्याचे भासवून कारवाईच्या नावाखाली घरात घुसून महिलेची सोनसाखळी चोरणाऱयाला अखेर ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अक्षय बाबू धोत्रे असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहेतक्रारदार या ज्येष्ठ नागरिक महिला असून त्या लोखंडवाला येथील एका सोसायटीत राहतात. त्यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. गेल्या आठवडय़ात अक्षय हा त्या इमारतीत आला. त्याने आपण पालिका कर्मचारी असून के पूर्व वॉर्डमधून आल्याचे इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला सांगितले. सोसायटीत घर दुरुस्तीचे काम सुरू आहे का अशी त्याने विचारणा करून तो महिलेच्या घरात शिरला. दुरुस्तीसाठी पालिकेची परवानगी घेतली आहे का अशी त्याने विचारणा केली. कारवाई करू नये म्हणून दहा हजार रुपये द्यावे लागतील असे धोत्रेने महिलेला सांगितले.
महिलेने धोत्रेला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर धोत्रेने महिलेच्या गळय़ातून सोनसाखळी चोरली. सोनसाखळी चोरल्यावर धोत्रे हा इमारती खाली आला. तेथून तो रिक्षाने खारदांडा येथे गेला. जबरी चोरीप्रकरणी महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक मनोहर धनावडे याच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन जाधवर, सहायक निरीक्षक संदीप पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या फुटेजवरून पोलिसांचे पथक खारदांडा येथे पोहचले. तेथून पोलिसांनी धोत्रेला ताब्यात घेऊन अटक केली. अक्षयविरोधात दादर आणि दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.