प्रेम संबंधातून एका विवाहित महिलेची पतीने हत्या

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करताहेत. अशातच, पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यात प्रेम संबंधातून एका विवाहित महिलेची पतीने हत्या केली आहे. पतीचे नोकरीच्या ठिकाणी दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने त्याने पत्नीचा खून केला.

सदरील घटना पौड पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. प्रियांका पटेल असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून स्वप्नील पटेल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील हा मुळशी तालुक्यातील श्रध्दा हॉस्पिटलमध्ये परिचारक म्हणून काम करत होता.

त्याच हॉस्पिटलमध्ये प्रियांका पटेल ही देखील नोकरी करत होती. कालांतराने प्रियांका आणि स्वप्नीलमध्ये ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच स्वप्नीलचे प्रियांका क्षेत्रे बरोबर लग्न झाले होते. मात्र लग्नानंतरही स्वप्नीलचे हॉस्पिटलमधील (Hospital) प्रेयसीबरोबर विवाहबाह्य संबंध होते. आपल्या कारनाम्यांची पत्नीला चाहूल लागू नये आणि दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करता यावं यासाठी त्याने प्रियांकाची हत्या करण्याचा डाव आखला.

स्वप्नीलने प्रियंकाची हत्या करण्यासाठी आधीच प्लॅनिंग केले होते. त्याने हॉस्पिटलमधील काही घातक औषधे चोरून स्वत:च्या घरी आणली. त्यानंतर त्याने पत्नीला तुझं डोक दुखत आहे, बिपी आणि साखर वाढली आहे अशी विविध कारणे देत घातक औषधे (Medicines) आणि भुलीचे इंजेक्शन दिले. सातत्याने चुकीची औषधे दिल्याने प्रियांकाची तब्येत बिघडली. अखेर यामुळे तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, पत्नीची हत्या केल्यावर कुणालाही आपल्यावर संशय येऊ नये यासाठी स्वप्नीलने पत्नीने आत्महत्या केल्याचा कट रचला. यात त्याने प्रियांकाने आत्महत्या केली आहे अशी एक चिठ्ठी देखील लिहिली. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी आरोपी स्वप्नीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.