महाराष्ट्रराजकीय

लोकसभेच्या निम्म्या जागांचे मतदान होताच शरद पवारांनी सांगितलं इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण?


महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. तर देशात जवळपास 285 जागांसाठी मतदान झाले आहे. निवडणुकीचे वारे कुठे वाहात आहे याचा अंदाज ओळखणारे नेते म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जाते.



शरद पवारांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाची चर्चा आता सुरु केली आहे. देशात मोदींच्या विरोधात अंडरकरंट असल्याचे सांगत विरोधी पक्षातील नेते एका छत्राखाली येण्याचे भाकित शरद पवारांनी वर्तवले आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी 1977 च्या निवडणुकीचा दाखला देऊन जनता पक्षाच्या सरकारने कुठे पंतप्रधान पदाचा उमेदवार आधी जाहीर केला होता, असे विधान शरद पवारांनी केले आहे.

इंडिया आघाडीची स्थापना झाली तेव्हाच ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावा अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नावही सुचवले होते. मात्र इंडिया आघाडीत यावर फार चर्चा झाली नाही. सत्तेत असलेल्या भाजपला सत्तेतून पायउतार करणे हे पहिले काम असल्याचे तेव्हा म्हटले गेले आणि पंतप्रधानपदाची चर्चा थांबली. मात्र आता जेव्हा देशात निम्म्यापेक्षा जास्त जागांवर मतदान झाले तेव्हा इंडिया आघाडीतील ज्येष्ट नेते शरद पवारांनी पंतप्रधानपदाच्या चर्चेला हवा दिली आहे.

छोटे पक्ष एका ठिकाणी येतील – शरद पवार

शरद पवार म्हणाले की, 2019 आणि 2024 मधील निवडणुकीत फरक आहे. मोदी विरोधात अंडरकरंट आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती पार्टी, वायएसआर काँग्रेस, टीडीपी, भारत राष्ट्र समिती यापक्षांच्या नेत्यांना, त्यांच्या मुलामुलींवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. घराणेशाहीचा आरोप होत आहे. त्यामुळे हे सर्व एक व्यापक दृष्टीकोणातून एका ठिकाणी येतील असं शरद पवार म्हणाले.

ज्या पद्धतीने 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हा मोरारजी देसाई यांना पक्षांतर्गत समर्थन कमी होते, त्यापेक्षाही जास्त समर्थन सध्या राहुल गांधींना त्यांच्या पक्षांतर्गत आहे. राहुल गांधी हे सर्व प्रादेशिक पक्षांसोबत संबंध ठेवून आहेत, असेही शरद पवार म्हणाले.

सध्याची परिस्थितीत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधातील सर्वांची विचारसरणी ही सर्वसाधारण एकसारखीच आहे. त्यामुळे आम्ही निवडून आलो तर स्थिर सरकार दिले पाहिजे यासाठी सर्व एकत्र येतील असेही शरद पवार म्हणाले. लोकांना भाजपने पक्ष फोडणे आवडलेले नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालेली फाटाफूट आणि त्यानंतर मोदींसोबत गेलेले नेते हे लोकांना आवडत नाहीत असेही शरद पवार म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button