ताज्या बातम्यामहाराष्ट्र

३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर दिवाळखोरीची टांगती तलवार


मुंबई: सर्वच प्रकल्पांच्या सूक्ष्म संनियंत्रणासाठी महारेराने पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. यासाठी महारेरा विकासकांनी महारेरा संकेतस्थळावर अद्ययावत केलेल्या माहितीची छाननी तर करतेच याशिवाय इतर स्त्रोतांमधूनही प्रकल्पस्थिती समजून घ्यायचा सातत्याने प्रयत्न करते.अशी छाननी करताना महारेराकडे नोंदणीकृत असलेले तब्बल 308 प्रकल्प दिवाळखोरीच्या अनुषंगाने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या संकेतस्थळावर असल्याचे आढळून आले आहे विविध बँका , वित्तीय संस्था , या क्षेत्रातील पतपुरवठा करणारे इतर घटक यांनी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत राज्यातील या 308 प्रकल्पांवर नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू केलेली आहे. यातील गंभीर बाब अशी , या 308 प्रकल्पांपैकी 115 प्रकल्प सध्या सुरू असलेले असून यातील 32 प्रकल्पांत 50 टक्के पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. तर उर्वरित 193 प्रकल्प हे व्यापगत( Lapsed) असून यातील तब्बल 150 प्रकल्पांतही 50% पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. सुरू असलेल्या 83 प्रकल्पांत आणि व्यापगत झालेल्या 43 प्रकल्पांत 50 टक्के पेक्षा कमी नोंदणी झालेली असल्याचे दिसते.



हे प्रकल्प महारेराकडे दर 3 महिन्याला प्रकल्पात किती नोंदणी खरेदी विक्री झाली याची माहिती अध्ययावत करीत नसल्याने हे प्रकल्प याही स्थितीत नवीन ग्राहक स्वीकारत आहेत का, हे स्पष्ट होत नाही. या व्यवहारात पारदर्शकता असावी आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांना सावध करण्यासाठी महारेराने ही समग्र यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. ग्राहकांनी ही यादी बघून याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन महारेराच्या वतीने ग्राहकांना करण्यात आले आहे.

या 308 प्रकल्पांपैकी सर्वात जास्त म्हणजे 100 प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील आहेत. यानंतर मुंबई उपनगरातील 83 , मुंबई शहरातील 15 प्रकल्प यात आहेत. पुणे जिल्ह्यातीलही 63 प्रकल्प या यादीत असून पालघर 19, रायगड 15 , अहमदनगर 5, सोलापूर ४, छत्रपती संभाजीनगर 1, रत्नागिरी 1, नागपूर 1 आणि सांगली 1 या जिल्ह्यांतील एकेक प्रकल्पाचा या यादीत समावेश आहे.

या 308 प्रकल्पांपैकी 115 हे सुरू असलेले प्रकल्प आहेत. या सुरू असलेल्या प्रकल्पांत ठाणे भागातील 50, मुंबई उपनगर 31, मुंबई शहर 10, पुणे आणि रायगड प्रत्येकी 8, अहमदनगर 5, पालघर 2 आणि सोलापूरच्या एका प्रकल्पाचा यात समावेश आहे. यातील व्यापगत प्रकल्पांची संख्या 193 असून यात पुणे 55, मुंबई उपनगर 52, ठाणे 50, पालघर 17, रायगड 7, मुंबई 5, सोलापूर 3, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्य़ातील प्रत्येकी एक प्रकल्पाचा यात समावेश आहे.

NCLT यादी महारेरा संकेतस्थळावर कशी शोधाल

ही यादी शोधण्यासाठी महारेरा संकेतस्थळावर जा. maharera.mahaonline.gov.in यात मराठीत नोंदणी इंग्रजी असेल तर Registration वर क्लिक करा. यात आठव्या क्रमांकावर NCLT Projects क्लिक करा. ही समग्र यादी येथे उपलब्ध आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button