मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं भारताने स्पष्ट केलं
मुंबई : मुंबई येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे.
त्यासाठी भारताने मुंबईवरील हल्ल्याचा ऑडिओच ऐकवला. त्यातील पाकिस्तांनी अतिरेक्यांनी दिलेल्या चिथावणी आणि कारवाईचे वृत्तांत ऐकून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील उपस्थितही हादरून गेले. भारताने केलेल्या या पोलखोलमुळे पाकिस्तानला चांगलाच घाम फुटला
दक्षिण मुंबईतीली पॅलेस हॉटेलात हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. नोव्हेंबर 2008मध्ये अतिरेक्यांनी या हॉटेलवरही निशाणा साधला होता. या संमेलनात भारताने मुंबईवर हल्ला करणारा मास्टरमाइंड साजिद मीरची ऑडिओ क्लिप ऐकवली.
त्यात साजिद मीर दिसेल त्याला गोळी झाडण्याचे आदेश देताना ऐकायला येत आहे. जिथेही मुव्हमेंट दिसेल, एखादा व्यक्ती छतावरून येत आणि जात असेल तर तिथे धाड धाड गोळीबार करा. त्याला माहीत नाही इथे काय चाललं आहे, असं साजिद मीर सांगताना ऐकायला येत आहे. तर नरीमन हाऊसमध्ये असलेला अतिरेकी तसंच करणार असल्याचं सांगताना ऐकायला मिळत आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत भाष्य केलं. 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अजूनही सुरक्षित आहे. त्याला अजून शिक्षा ठोठावली गेली नाही. तो मोकाटच आहे. जेव्हा काही अतिरेक्यांवर बंदी घालण्याची वेळ येते. मागणी केली जाते, तेव्हा राजकीय कारणास्तव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कच खाते. हे आम्हाला सांगायला खेद वाटतो, असं जयशंकर यांनी सांगितलं.
एखाद्या अतिरेक्याला शिक्षा न होणे ही गोष्ट चुकीची आहे. सामुहिक विश्वासहार्यता आणि सामुहिक हित नसल्याचं या स्थितीतून दिसून येतं. मुंबईवरील हा हल्ला केवळ मुंबईवरील नव्हता तर तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायावरील हल्ला होता, असंही त्यांनी सांगितलं.
अतिरेक्यांनी हे संपूर्ण शहर वेठीला धरलं होतं. सीमेपलिकडून हे अतिरेकी आले होते. या हल्ल्यात 140 भारतीय आणि 23 देशातील 26 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असं त्यांनी सांगितलं. यावेळी जयशंकर यांनी पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला.