साहित्य संमेलनात मोदींनी पवारांसाठी सरकावली खुर्ची आणि टाळ्यांचा झाला गजर

पुणे : अठ्ठ्यानवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून नवी दिल्ली येथे सुरू असून या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत डॉ. तारा भवाळकर. संमेलनाच्या उदघाटन सत्राला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर जेव्हा ते बसण्यासाठी आपल्या आसनाकडे गेले, तेव्हा पंतप्रधान नरेंद मोदी आदराने उभे राहिले आणि त्यांनी लगबगीने पवारांसाठी खुर्ची सरकावली, तसेच त्यांच्या समोरील ग्लासात पाणीही ओतून दिले. पंतप्रधानांच्या या कृतीमुळे सभागृहात उपस्थितांनी टाळ्यांचा एकच गजर केला.
साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरूवात होत असून त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच साहित्य संमेलन असून त्याचे स्वागताध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार आहेत. त्यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्य आणि संस्कृतीचा समग्र आढावा घेतला. तसेच प्रसिद्ध गीतकार लेखक ग. दि. माडगुळकर यांचे गीत रामायण, अयोध्येतील राम मंदिर, साहित्यिक आणि कवी असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाही मनोभावे उल्लेख केला.
भाषण संपल्यानंतर शरद पवार यांना त्यांच्या सहायकांनी हाताला धरून आसनाकडे नेले, तेव्हा शेजारीच असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदराने उभे राहिले. इतकेच नाही, तर त्यांनी श्री. पवार यांची खुर्ची सरकावून त्यांना बसण्यासाठी मदत केली. त्यानंतर त्यांच्या ग्लासात पाणीही ओतून दिले. मोदी यांची ह सहजकृती सभागृहाला भावली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.