बीड शेतकऱ्याने नुकसान झालेले सोयाबीन दाखवत जीवन संपवले
बीड : अतिवृष्टीमुळे राज्यात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण पीक हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय. शेतकरी हवालदील झाला असून अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील राजेगाव येथील शेतकऱ्याने नुकसान झालेले सोयाबीन दाखवत जीवन संपवले आहे.
संतोष दौंड असे जीवन संपवलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणानंतर आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे सत्ताधारी मुख्यमंत्री, कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का? शेतकऱ्यांना मदत मिळणार का? कधी मिळणार आणि किती मिळणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेवर बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले की, राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, सरकार त्यांना संपूर्ण मदत करणार आहे. आत्मनत्या करून शेतकऱ्यांनी आपला परिवार उद्धवस्थ करू नये. दरम्यान, अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी सद्या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे.
बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी म्हंटले की, सर्व भागातील नुकसानीची पाहणी सुरू आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तहसीलदार यांना नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना पीक विमा आणि इतर मदत कशी मिळेल याकडे लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करतो हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील सोयाबीन पीक उद्धवस्थ झालं आहे. इतर पक्षाचे लोक एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त आहेत. त्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. उत्पादन खर्च जास्त झाला असून उत्पादन कमी झाले आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की, आपण यांच्याविरोधात संघर्ष करू लढून यांच्या छातीवर बसून सोयाबीनला भाव घेऊ आणि नुकसान भरपाई घेऊ, वेळ पडली तर चौकात नेत्यांच्या गचांड्या धरून ठोकून काढू पण जीवन संपवू नका, असे आवाहनही तुपकर यांनी केले आहे.