पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली?
भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली आहे.भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडली. परंतु, आता या प्रकरणात एक नवा ट्वीस्ट आला आहे. भगीरथ बियाणी पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी झाडली गेली असल्याचा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येसंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आता बियाणी यांच्या कुटुंबीयांनी पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेल्याची माहिती पोलिसांना दिल्यानं या आत्महत्या प्रकरणात नवीत ट्वीस्ट निर्माण झाला आहे .
पोलिसांनी बियाणी यांचा मोबाईल न्यायवैद्यक चाचणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. बीड शहरातील विप्र नगर भागांत राहणारे भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये डोक्यात स्वतःकडील पिस्तुलनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.
भगीरथ बियाणी यांचे बंधू बाळकृष्ण बियाणी यांनी पेठ बीड ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या आत्महत्येनंतर बीडमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होत्या. पोलिसांनीसुद्धा या आत्महत्यांसंदर्भात तपास सुरू केला आहे.
आमदार श्रीकांत भारतीय एसपींच्या भेटीला
आमदार श्रीकांत भारतीय यांनी भगीरथ बियाणी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि इतर पदाधिकारी सोबत होते.