‘पती पत्नी और वो’ या चित्रपटापेक्षाही नाट्यमय..

अनामिकाचे चार वर्षांपूर्वी पहिल्या पतीशी लग्न झाले. लग्नानंतर तो काहीच काम करीत नसल्याची माहिती समोर आली. यावेळी ती सातत्याने त्याला कुठलेही काम करण्याबाबत सांगत होती. मात्र, तो ऐकत नसल्याने तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेत आईचे घर गाठले. घरी येताच कोरोनामुळे टाळेबंदी लागली. त्यामुळे ती इथेच थांबली आणि हा प्रकार घडला.
नागपूर : अपहरण झालेल्या पत्नीची शोधाशोध सुरू असताना ती चक्क पहिल्या पतीसोबत नांदत असल्याचे दुसऱ्या पतीला समजले. ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटापेक्षाही नाट्यमय घडामोडी असलेली ही कहाणी पोलिसांनी समोर आणली असली तरी तरी समुपदेशकांनी ताटतूट, घटोस्फोटापर्यंत प्रकरण जाऊ दिले नाही.
तिचीच इच्छा जाणून घेऊन दुसऱ्या पतीसोबत पाठवणी केली.
सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनामिका (बदललेले नाव) ही आईसह वास्तव्यास होती. तिचे परिसरात राहणाऱ्या मुलावर प्रेम जडले. तोही तिच्या प्रेमात बुडाला. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. अनामिका हिने तिचे यापूर्वी लग्न झाल्याचे सांगून पतीशी घटस्फोट घेतल्याची माहिती दिली. त्यावर मुलाने डोळे लावून विश्वास ठेवला. नातेवाईकांच्या साक्षीने लग्न केले. लग्न झाल्यावर काही महिने सुखाने संसार सुरू असताना ती पहिल्या पतीच्या संपर्कात आली.
त्याने तिला सोबत येण्याची विनंती केली. तीसुद्धा कुठलाही विचार न करता पहिल्या पतीसोबत सिवनी (मध्यप्रदेश) गेली. मावशीकडे जाते असे सांगून तब्बल पाच महिने पत्नी परतली नसल्याने दुसरा पती इकडे चिंतेत पडला. शोधोशोध सुरू असताना ती पहिल्या पतीकडे असल्याचे आढळले. दुसऱ्या पतीने लग्नाची आठवण करून देत परत चलण्याची विनंती केली. ती शिवनीसोडून नागपूरला आली.
ती परत येत नव्हे तोच, पहिला पती तिला परत घेऊन गेला. हे लक्षात येताच दुसऱ्या पतीने अनामिकाच्या अपहरणाची तक्रारच सीताबर्डीत दोन दिवसांपूर्वी दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सिवनीतील नैनपूर येथून तिला परत आणले. पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत तिने दोघांसोबत लग्न केल्याचे आढळले. दुसरे लग्न करण्यापूर्वी पहिला नवऱ्याला घटस्फोटसुद्धा दिला नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे नात्याची गुंतागुंत निर्माण झाली होती. पोलिसांनी हे प्रकरण समुपदेशांकडे सोपवले. गुंतागुंत सुटल्यावर पत्नीने दुसऱ्या पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला.