ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीयशेत-शिवार

अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल; तातडीने मदत जाहीर करा – अजित पवार


मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच एप्रिल महिन्यातही सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.



राज्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार तर फळबागांसाठी हेक्टरी 1 लाख मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या गारपिटीमुळे रब्बीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून पूर्णता गेले आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने हजारो जनावरे तसेच घरांचेही नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वीज कोसळून शेतकऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पारस येथे बाबुजी महाराजांच्या यात्रेत महाआरतीदरम्यान वादळी पावसामुळे लिंबाचे झाड पडल्याने टिनशेडखाली दबून ६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सुमारे ५० ते ६० भाविक टिनशेडखाली अडकले होते. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात आठवड्याभरापासून अवकाळी व गारपिटीचे संकट आलेले असताना, शेतकरी उद्धवस्त झालेला असताना, अनेकांना मृत्यू ओढवला असताना राज्यसरकार गंभीर नाही, मंत्रिमंडळातील एकही मंत्री महाराष्ट्रात नाही, हे चित्र महाराष्ट्राला शोभणारे नाही.

मार्च महिन्यातील अवकाळी व गारपीटग्रस्त क्षेत्राचे राहिलेले पंचनामे, पंचनाम्यातील त्रुटी, जिल्ह्याचे सर्वंकष प्रस्ताव शासनाला सादर करणे, ही कामे राहिलेली आहेत. नव्याने एप्रिलमधील अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत.

अशा परिस्थितीत 3 एप्रिल, 2023 पासून राज्यातील नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकारी बेमुदत संपावर गेले होते. परिणामी राज्याच्या 358 तालुक्यात महसूल विभागाचे कामकाज 4 दिवस ठप्प झाले होते. याचाही फार मोठा फटका नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजनांना बसला आहे. पंचनाम्यांच्या कामांनाच सुरुवात झालेली नसल्यामुळे नुकसानभरपाईच्या घोषणेला आणखी किती काळ लागेल, हेही सांगता येत नाही.

हातातोंडाशी आलेला घास लागेपाठच्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेला आहे. शेतीसाठी केलेला खर्च देखील निघेल की नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना रोख हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने जाहीर करण्याची आवश्यकता आहे, असं अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button