फोनवरून मित्रांशी बोलणं संतापाच्या भरात आईवडिलांनीच कालव्यात फेकून दिलं
फोनवरून मित्रांशी बोलणं न आवडल्याने आईवडिलांनीच आपल्या मुलीला कालव्यात फेकल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडली आहे. आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करत एक दांपत्य पोलिसात गेले होते.
तिचा तपास लावताना आईवडिलांनीच तिला कालव्यात फेकल्याचं उघड झालं.
बागपत येथे राहणाऱ्या बबलू आणि रुबी या दांपत्याला तीन मुलं आहेत. हे कुटुंब गंगानगर येथे भाड्याने राहतं. गुरुवारी संध्याकाळी आपली 11 वर्षांची मुलगी चंचल ही बेपत्ता झाल्याची तक्रार या दोघांनी दाखल केली. चंचल ही शारदा पब्लिक स्कूलची पाचव्या इयत्तेत शिकते.
चंचल ही बर्गर खाण्यासाठी गेली आणि तिथून बेपत्ता झाली असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं. पोलिसांनी बबलू आणि रुबी यांच्याकडे तिची चौकशी केली तेव्हा त्यांच्या जबाबात फरक असल्याचं त्यांना आढळून आलं. तेव्हा त्यांनी त्या दोघांची कठोर चौकशी केली. त्यावेळी त्यांनी एक भयंकर सत्य सांगितलं.
चंचल मोबाईलवरून सतत तिच्या मित्रांशी बोलत असे. आपल्या मुलीने मुलांसोबत बोलणं रुबी आणि बबलूला मान्य नव्हतं. ते तिला नेहमी ओरडत असत. पण, शुक्रवारी त्यांना संताप आला आणि संतापाच्या भरात त्यांनी चंचलला कालव्यात फेकून दिलं. चंचल त्या कालव्यात बुडाली. पोलिसांना अद्याप तिचा मृतदेह सापडलेला नाही. पोलीस तिच्या मृतदेहाचा शोध घेत असून रुबी आणि बबलूला अटक करण्यात आली आहे.