शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना ज्योती मेटे संबोधित करणार ६ सप्टेंबर रोजी ही राज्यस्तरीय बैठक
पुणे : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा गेल्या महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मेटे यांनी अनेक वर्ष संघर्ष केला.
मेटे यांच्यानंतर संघटनेची धुरा आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी स्वीकारण्याची शक्यता व्यक्त होत असून ज्योती मेटे पुण्यात राज्यस्तरीय बैठक घेणार आहे.
राज्यभरातील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना ज्योती मेटे संबोधित करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ६ सप्टेंबर रोजी ही राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यापाल कोट्यातून विधानपरिषदेवर घ्यावं आणि आमदार करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली होती.