आदर्श व्यक्तिमत्त्वे फक्त इतिहासातच का मिळतात?
सांगली : ”आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनीसुद्धा जुनाच इतिहास गिरवत बसणार आहोत की नवीन इतिहासही बनविणार आहोत?
त्यासाठीच मला नेहमीच वाटते, गांधीजींना मारले ते बरे झाले; नाहीतर आताची आपली अवस्था बघून महात्मा गांधी रोज मेले असते,” अशी व्यथा महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केली.
सांगली येथील शांतिनिकेतन विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, डॉ. बाबूराव गुरव, ज्ञानेश महाराव, किरण लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तुषार गांधी म्हणाले, ”आदर्श व्यक्तिमत्त्वे फक्त इतिहासातच का मिळतात? आजही ‘पत्री सरकार’ची गरज आहे. आताचे सरकार गद्दार आहे. याच सरकारमधील लोक आझादीच्या वेळी इंग्रजांसोबत होते आणि तरीही आपण बेशरमरीत्या आझादीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आजही पाणी पिण्यावरून सवर्ण मागासवर्गीयांवर अत्याचार करीत आहेत. यावर पंतप्रधान ब्रही काढत नाहीत. यातून कसली लोकशाही दिसून येते? ही तर राजेशाही आहे. दिल्लीत एका युवतीवर बलात्कार झाला. यानंतर मोठा उठाव झाला; पण बिल्किस बानोवरील अत्याचाऱयांच्या विरोधात कोणी का उभे राहिले नाहीत? ती मुस्लिम होती म्हणून का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.