औरंगाबाद,जालना विजांच्या कडकडाटासह जोरदार पाउस बीड वीज पडून महिला ठार
सुमारे २५ दिवसांच्या खंडानंतर गणेशा बरोबर पावसाचे आगमन जिल्ह्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड शहर व परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. केज तालुक्यातील काळेगाव येथे आत्माराम माणिक आगे, अन्नपूर्णा आत्माराम आगे, रामरतन चंद्रकांत आगे व शीला रामरतन आगे या शेतात असताना वीज कोसळली. त्यात शीला आगे यांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले.
औरंगाबाद : ऑगस्ट कोरडा गेल्यात जमा असताना या महिन्याच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी दुपारी शहर व परिसरात सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. शहराच्या काही भागाला पावसाने झोडपून काढल्याने तासाभरात रस्ते जलमय झाले.
गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या, मूर्ती मंडपात आणण्यासाठी गेलेल्या मंडळांच्या सदस्यांची तारांबळ उडाली.
शहर परिसरात सुमारे २५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज प्रचंड उकाडा जाणवत होता. सिडको एन तीन व परिसरात दुपारी मुसळधार पाऊस झाला. क्रांती चौकापासून पलीकडील भागात सायंकाळी जोरदार पाऊस झाला तर अर्धे शहर कोरडे होते. एमजीएम विद्यापीठाच्या वेधशाळेत ४१.१ तर चिकलठाणा येथील वेधशाळेत १७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जालन्यात दमदार हजेरी
दीर्घकाळ दडी मारलेल्या पावसाने आज विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार हजेरी लावली. सव्वा ते दीड तास पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरूच होती. अंबड शहर, अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातही पाऊस झाला.