देशाचा GDP यंदाच्या वर्षात 7.4 टक्के दराने वाढणार – निर्मला सीतारमण
देशात सतत वाढणारी महागाई आणि जीडीपीच्या दरावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या जीडीपीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशाचा GDP यंदाच्या वर्षात 7.4 टक्के दराने वाढणार असल्याचं निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनेही भारताचा विकास दर पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये सर्वात जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही अशाच प्रकारचा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असल्याचेही ते म्हणाले. एफई बेस्ट बँक्स अवॉर्ड्स कार्यक्रमादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माहिती दिली.
जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्यामुळे निर्यात क्षेत्राला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे, त्यांनी निर्यातदारांना आश्वासन दिले की, सरकार अशा संस्थांना सहकार्य करत राहील जेणेकरून त्यांना संकटाचा सामना करता येईल.
आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांनी म्हटले आहे की, महागाईचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. हे राजकीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंच्या वाढत्या किंमतीमुळे होत आहे. महागाई कमी करण्यासाठी आरबीआयने आपल्या आर्थिक धोरणाचा वेग पुढे नेला आहे. उच्च चलनवाढीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बेंचमार्क रेटमध्ये आतापर्यंत 140 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे