पहिल्या इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसचे उद्घाटन
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी मुंबई मध्ये पहिल्या इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसचे उद्घाटन करण्यात आले. या बद्दल गडकरी यांनी ट्वीट केले असून ते म्हणतात,’ झिरो कार्बन इमिशन हे ध्येय आपण ठरविले आहे.
सतत क्रांतीची सुरवात देशात झाली आहे, मुंबईत अशोक लेलँड च्या इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसचे उद्घाटन करताना आनंद होतो आहे.’
देशात वाहतूक सेक्टरचा वेगाने विकास होत आहे. अशोक लेलँडच्या ‘स्विच मोबिलिटी लिमिटेड’ ने या बस तयार केल्या आहेत. या डबलडेकर मधून एकावेळी ६८ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. मुंबई मध्ये बेस्टच्या बसेस या नव्या इलेक्ट्रिक बसेसने बदलल्या जात असून अश्या २०० इलेक्ट्रिक बसची ऑर्डर कंपनीला दिली गेली आहे. एका चार्ज मध्ये ही बस २५० किमी अंतर जाते आणि तिला फुल चार्ज होण्यासाठी तीन तास लागतात.
स्विच ईआयव्ही २२ ही अशोक लेलँडची इव्ही डिविजन आहे. स्विचच्या इलेक्ट्रिक बसेस युके मध्ये बराच काळ वापरात आहेत. मुंबईत सप्टेंबरपासून या बसेस नियमित चालविल्या जाणार आहेत. या बससाठी अत्याधुनिक फीचर्स दिली गेली असून त्यांचे डिझाईन, विकास आणि उत्पादन भारताच केले जात आहे. या बसेस सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवितील असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.