मंत्रिपद द्यायचं नव्हतं..पण माझं लेकरू मारायचं नव्हतं
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यावर काल (15 ऑगस्ट) बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या या अपघाती मृत्यूवर शंका उपस्थित करण्यात येत आहेत.
दरम्यान, त्यांच्या आईने मंत्रिपद द्यायचं नव्हतं..पण माझं लेकरू मारायचं नव्हतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मेटेंच्या आईच्या विधानामुळे आरोप नेमका कुणावर ? असा सवाल उपस्थित होत आहे.
मेटेंच्या आईंनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ‘त्यांनी मेटे यांना आमदारकी द्यायची नव्हती..मंत्रिपद द्यायचं नव्हतं..पण माझं लेकरू मारायचं नव्हतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे मेटेंच्या आईंचा हा आरोप नेमका कुणावर आहे. याची चर्चा होत आहे. याच प्रतिक्रियेचा व्हिडिओ कॉग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी ट्विट करत या मातेची आर्त किंकाळी सरकार ऐकणार का?, असा सवाल उपस्थित केला आहे.
मेटेंच्या आईपूर्वी, त्यांची पत्नी अपघात कसा घडला कळलं पाहिजे. चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. त्यांचं शरीर सांगत होतं की अपघात झाल्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात आणले गेले नाही मी डॉक्टर असल्याने मला लगेच कळलं की हा अपघात काही क्षणांपूर्वी किंवा अर्ध्यातासापूर्वी झाला नाही किमान दीड ते दोन तास अपघात घडून झाले आहेत हे मला पाहिल्याबरोबर कळलं. काय झालं ते मला माहिती नाही, माझं ड्रायव्हरशी बोलणं झालं नाही अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांची पत्नी ज्योती मेटे यांनी दिली आहे.
मेटे यांच्या अपघाताबाबात अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याबरोबरच अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे अनेकांकडून वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत.