बीड मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते
बीड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या सोहळ्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, राजकीय, शासकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर जिल्हावासियांना दिलेल्या संदेशात दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांना सर्वप्रथम अभिवादन करत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, दिनांक 13 ऑगस्टपासून देशभरात हर घर तिरंगा अभियान सुरु आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायत तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी शासकीय विभाग, सामाजिक, शैक्षणिक संस्था, पक्ष, संघटना अशा सामाजिक कार्यात असणाऱ्या प्रत्येक घटकाने एक होऊन अभियानासाठी काम केले आहे. हे अभियान घराघरापर्यंत पोहोचवण्यात विविध माध्यमांतून या सगळ्यांचा सहभाग मिळाला आहे. परिणामी आज जिल्ह्यातील प्रत्येक इमारतीवर तिरंगा डौलाने फडकतोय याचा मला आनंद होतो आहे, यासाठी प्रत्येक बीडवासियाचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकप्राप्त अविनाश साबळे या क्रीडापटूचे अभिनंदन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी बीड नामदेव टिळेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मच्छिंद्र सुकटे, बीड तहसीलदार सुहास हजारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ. दयानंद जगताप,
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळातील बीड जिल्ह्यातील कृषी विकास या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना, यामध्ये प्रथम क्रमांक सिद्धी सतीश दोन गाव (शिवाजी विद्यालय बीड) द्वितीय क्रमांक निर्मला प्रेम प्रकाश पांचाळ (जनता विद्यालय धारूर) तृतीय क्रमांक श्रद्धा परमेश्वर कांबळे (सोमेश्वर प्रशाला घाटनांदुर ता. अंबाजोगाई) यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषिविषयक विचार या विषयावरील वक्तृत्त्व स्पर्धेतील विजेते प्रथम पूजा अरुण खेडकर (निगमानंद विद्यालय शिरूर), द्वितीय मुक्ता बळीराम तेल, (कुंभेफळ ता अंबाजोगाई), तृतीय पुरस्कार प्रणाली शेषराव नाटकर (जिल्हा परिषद केंद्रीय शाळा पाचेगाव बुद्रुक तालुका गेवराई व उत्तेजनार्थ पुरस्कार अवनी देविदास तैर, (डॉ. बापूजी पिंगळे विद्यालय, बीड) यांना देऊन सत्कार करण्यात आला. ऑनलाइन प्रक्रिया व जवळपास 10000 प्रमाणपत्र पडताळणीची यशस्वी कार्यवाही केल्याबद्दल जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार अध्यक्ष श्री. जगदाळे यांनी स्वीकारला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महसूल विभागातर्फे आयोजित नुकत्याच झालेल्या विविध शासकीय विभाग व संघटनांच्या क्रिकेट स्पर्धातील विजेत्या संघांचा सत्कार करण्यात आला. सदर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिल्हा परिषद बीड यांनी पटकावले असून संघाचे कर्णधार राजेश आघाव, उपविजेता संघ डॉक्टर संघाचे कर्णधार अनिल जाधव यांचा पुरस्कार देऊन सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार गणेश आघाव यांना देण्यात आला. विजेत्या संघातील खेळाडूंनाही यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या रुग्णालयांचा कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये अंबेजोगाई येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, स्व. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर रुग्णालयाच्या प्रमुख प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ नागरिक यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्यसैनिक हन्नु बाळाराम जाधव, कारभारी शिवराम सानप (वडजाळी तालुका पाटोदा) तसेच जिल्ह्यातील विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन पोलीस दलाचे हेड कॉन्स्टेबल अनिल शेळके यांनी केले.