ऑफिसमध्ये अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना आरोग्य उपसंचालक मात्र लाच घेण्यात व्यस्त
कोल्हापुरात एक महिला मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाली आहे. भावना चौधरी असं या महिला प्रशासकीय अधिकारीचं नाव आहे. संबंधित महिला अधिकारी ही क्लास वन अधिकारी आहे. पण तरीही या महिलेने अशाप्रकारचं कृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महिला अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडे 56 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती. एसीबी अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत कारवाई केली आणि महिला अधिकाऱ्याला अटक झाली. संबंधित महिला अधिकारी भावना चौधरी या कोल्हापूरच्या आरोग्य सेवा मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या. तक्रारदार व्यक्तीने त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील 6 लाख 72 हजार रुपये मंजूर करण्यासाठी विनंती केली होती.
पण त्यासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांनी रकमेच्या 10 टक्के प्रमाणे लाच मागीतली होती. अखेर तडजोडीअंती 5 हजार रुपये देणे निश्चित झालं होतं. तक्रारदार व्यक्तीने महिला अधिकाऱ्यासोबत लाचेबाबत तडजोड करुन 5 हजार रुपये निश्चित केले. त्यानंतर एसीबीकडे तक्रार केली.
त्यांच्या तक्रारीची दखल घेत एसीबी अधिकारी कामाला लागले. त्यांनी सापळा रचला आणि महिला अधिकाऱ्याला रंगेहात लाच घेताना पकडण्याचं ठरवलं. एसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारीनुसार अगदी तसंच घडलं आणि त्यांनी रचलेला सापळा यशस्वी ठरला. एसीबी अधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला रक्षाबंधनाच्या दिवशी लाच घेताना रंगेहाथ पकडलं.
विशेष म्हणजे ऑफिसमध्ये अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना आरोग्य उपसंचालक मात्र लाच घेण्यात व्यस्त होत्या. या लाचखोर अधिकाऱ्याचा पर्दाफाश लाचलुचपत विभागाने करत रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोग्य उपसंचालक असलेल्या भावना चौधरी यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. एका बाजूला अमृत महोत्सवी कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी हे काम मंजूर करण्यासाठी तक्रारदाराला कार्यालयात बोलवून घेतले होते. यावेळी 5 हजार रुपयांची लाच घेताना त्या लाचलुचपत विभागाच्या ताब्यात अलगद सापडल्या. ‘या’ अधिकाऱ्यांनी केली कारवाई सापळा पथक : आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, पो.हे.कॉ.शरद पोरे पो.कॉ संदीप पडवळ पो.कॉ.मयूर देसाई पो.कॉ.रुपेश माने म.पो.कॉ.छाया पाटोळे लाप्रवि, कोल्हापूर. मार्गदर्शन अधिकारी : राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे