Weather Update : राज्यावर अवकाळीचे संकट ! ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

राज्यातील हवामानात सध्या वेगवान बदल होत असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे.
विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यातील हिंगोली तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदियात सोमवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोलीत, लातूरमध्ये पावसाला सुरुवात झाली असून धाराशिव (उस्मानाबाद), नांदेड आणि उर्वरित राज्यात ढगाळ आकाश राहून कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे.उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या असतानाच, नैऋत्य बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
देशातील तापमानातील तफावतही लक्षणीय आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) पंजाबच्या भटिंडा येथे सपाट मैदानी भागातील सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दुसरीकडे, आंध्र प्रदेशच्या कर्नूल येथे दिवसाचे उच्चांकी तापमान ३७.० अंश सेल्सिअस होते. महाराष्ट्रातही रविवारी (२१ फेब्रुवारी) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी तापमान ११.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर मुंबईच्या सांताक्रूझ येथे ३६.३ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान होते.
हवामान तज्ज्ञांच्या मते,पुढील २-३ दिवसांत राज्यातील कमाल तापमान २-३ अंशांनी वाढण्याची शक्यता असून, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची तीव्रता जाणवू शकते. मात्र, अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी तात्पुरती थंडी येऊ शकते. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.











