जनरल नॉलेजताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेलोकशाही विश्लेषण

Human evolution: पूर्व आशियात तब्बल 18 लाख वर्षांपूर्वीच पोहोचला मानव…


बीजिंग/ वॉशिंग्टन : चीनमध्ये उत्खननादरम्यान सापडलेल्या ‌’होमो इरेक्टस्‌‍‌’ प्रजातीच्या तीन कवट्यांबाबत शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. एका नवीन संशोधनानुसार, या कवट्या सुमारे 18 लाख वर्षांपूर्वीच्या असल्याचे समोर आले आहे.

 

हा काळ यापूर्वीच्या अंदाजापेक्षा तब्बल 6 लाख वर्षांनी जुना आहे. ‌’सायन्स ॲडव्हान्सेस‌’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये बुधवारी (दि. 18) प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, हुबेई प्रांतातील ‌’युनक्सियान‌’ येथे सापडलेल्या या कवट्या आता पूर्व आशियातील मानवी पूर्वजांच्या अस्तित्वाचा सर्वात जुना पुरावा ठरल्या आहेत.

 

या संशोधनाचे सहलेखक आणि हवाई विद्यापीठातील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक ख्रिस्तोफर बे यांनी सांगितले की, ‌’जेव्हा विश्लेषणाचे निकाल समोर आले, तेव्हा मला प्रचंड आश्चर्य वाटले. ‌’या नवीन खुलाशामुळे मानवी उत्क्रांती आणि ‌’होमो इरेक्टस्‌‍‌’चा उगम कधी झाला, यावर तज्ज्ञांना पुन्हा विचार करावा लागणार आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, ‌’होमो इरेक्टस्‌‍‌’चा उगम सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाला आणि तेथून ते जगभर पसरले. जॉर्जियामधील ‌’दमानिसी‌’ येथे मिळालेले 17.8 ते 18.5 लाख वर्षे जुने अवशेष हे आशियातील मानवी अस्तित्वाचा पहिला पुरावा मानले जात होते. मात्र, युनक्सियान येथील नव्या पुराव्यांनी हे चित्र बदलले आहे.

 

चीनमध्ये यापूर्वी 21 लाख आणि 24.3 लाख वर्षे जुनी दगडाची हत्यारे सापडली आहेत. ही हत्यारे होमो इरेक्टस्‌‍च्या उत्पत्तीच्या सिद्धांताला आधीच आव्हान देत होती. आता या कवट्यांनी त्या दाव्याला अधिक बळ दिले आहे. 1989 ते 2022 या काळात या तीन कवट्या सापडल्या होत्या. यापूर्वी प्राण्यांच्या दातांच्या आधारावर त्यांचे वय 10 ते 11 लाख वर्षे असावे असा अंदाज होता. मात्र, प्रा. बे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‌’कॉस्मोजेनिक न्यूक्लाईड बरियल डेटिंग‌’ नावाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रात गाळातील ‌’क्वार्टझ‌’ या खनिजाच्या थराचा अभ्यास केला जातो. यात ॲल्युमिनियम-26 आणि बेरिलियम-10 या रासायनिक घटकांच्या हाफ-लाईफचा अभ्यास करून, तो थर विश्वातील किरणांच्या संपर्कात कधी आला होता, हे मोजले जाते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button