जनरल नॉलेजताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रलोकशाही विश्लेषण

Earthquake : महाराष्ट्रला मोठा हादरा; ‘या’ ८ गावांना भूकंपाचे जोरदार धक्के, परिसरात भीतीचं वातावरण…


Earthquake News : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुखेड तालुक्यातील 7 ते 8 गावांमध्ये दुपारी सुमारे 3 वाजून 15 मिनिटांनी जमिनीतून गूढ आवाज आला आणि जमीन हलल्याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला.

हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेड, धनज आदी गावांमध्ये हे धक्के जाणवले. अचानक झालेल्या आवाजामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेत मोकळ्या जागेत आश्रय घेतला.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 इतकी नोंदवली गेली आहे. मुखेड तालुक्यातील खपराळा परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

जमिनीतून गूढ आवाज का येतो?

तज्ज्ञांच्या मते, जमिनीखालील खडकांच्या थरांमध्ये ताण साचल्यामुळे किंवा त्यांच्या हालचालीमुळे अचानक ऊर्जा मुक्त होते आणि त्यातून कंपने निर्माण होतात. यामुळेच जमिनीखालून मोठा आवाज येऊ शकतो.

काहीवेळा पावसाळ्यात पाणी खोल भेगांमधून आत शिरते. तेथील तापलेल्या खडकांच्या संपर्कात आल्यास वाफ तयार होऊन दाब निर्माण होतो. हा दाब अचानक सुटल्यास आवाज ऐकू येतो. तसेच जमिनीखालील नैसर्गिक पोकळ्यांमध्ये अडकलेली हवा बाहेर पडताना देखील अशा प्रकारचा गडगडाट होऊ शकतो.

यापूर्वीही धक्के

काही दिवसांपूर्वी पालघरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. तसेच जानेवारी महिन्यात पंढरपूर परिसरात दिवसभरात दोन वेळा जमिनीतून मोठा आवाज आल्याच्या घटना घडल्या होत्या.

तज्ज्ञांचे मत आहे की 3.0 तीव्रतेचा भूकंप सौम्य स्वरूपाचा असतो. मात्र अशा घटना वारंवार घडत असल्यास प्रशासनाने सतर्क राहून स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button