Ajit Pawar : दादांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार; मोदी-शाह राहणार उपस्थित…

PM Modi & Amit Shah Will Present For Ajit Pawar Last Funeral : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीला जाताना दादांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड प्लेनचा अपघात झाला यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
अजितदादांच्या पार्थिवावर उद्या (दि.29) रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे येणार असल्याचे सांगितले जात आहे.
उद्या होणार अजितदादांवर अंत्यसंस्कार
अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्याआधी अंतिम दर्शनासाठी पार्थिव शारदा प्रांगण येथे ठेवले जाणार आहे. अपघाताची बातमी समजताच शरद पवार मुंबईहून तर, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीहून बारामतीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे दादांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांची रूग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.
अजित पवार हे जनतेचे नेते होते
अजितदादांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी एक्कसवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले की, अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.”
अपघातात कुणा-कुणाचा मृत्यू
बारामती येथे झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह मुंबई पीएसओ HC विनित जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट होते. या सर्वांचा यात मृत्यू झाला आहे. मुंबईतून हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघाले होते. तर, बारामती येथे ८.५० मिनिटांनी पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला अन् आतील प्रवाशांचा मृत्यू झाला.










