ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रलोकशाही विश्लेषण

३ बंगले, कार अन् व्याजाचा धंदा; ‘त्या’ भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले! व्यापाऱ्यांना देत होता कर्ज..


 

Indore News : रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांकडे सहानुभूतीने पाहतो आणि त्यांना चार दोन पैसे देतो. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आलेली बातमी वाचून तुमचा भिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल.

सराफा बाजारात गेली अनेक वर्षे भीक मागणाऱ्या मांगीलाल नावाच्या भिकाऱ्याचा रॉयल थाट उघड झाला असून, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.

 

भीक मागून कमावले ३ बंगले आणि कार

महिला व बालविकास विभागाने इंदूरमध्ये राबवलेल्या ‘भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमे’त मांगीलालची पोलखोल झाली. दिसायला अत्यंत गरीब आणि हतबल वाटणाऱ्या मांगीलालकडे शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल ३ पक्की घरे आहेत. त्याच्याकडे भगतसिंग नगर भागात १६ बाय ४५ फुटांचे तीन मजली आलिशान घर, शिवनगरमध्ये ६०० स्क्वेअर फुटांचे दुसरे पक्के घर आणि अलवासमध्ये १० बाय २० फुटांचे १-बीएचके घर, जे त्याला अपंगत्वाच्या कोट्यातून मिळाले होते, इतकी स्थावर संपत्ती आहे.

इतकेच नाही, तर या ‘धनकुबेर’ भिकाऱ्याकडे ३ रिक्षा आहेत, ज्या तो भाड्याने चालवतो. धक्कादायक म्हणजे, त्याच्याकडे एक डिझायर कार असून ती चालवण्यासाठी त्याने चक्क ड्रायव्हर देखील ठेवला आहे.

 

व्यापाऱ्यांना व्याजाने देतो पैसे

मांगीलालची मोडस ऑपरेंडी पाहून अधिकारीही अवाक झाले. पाठीवर बॅग आणि हातात बूट घेऊन लोकांची सहानुभूती मिळवणारा हा भिकारी दिवसाला ५०० ते १००० रुपये भीक मिळवत असे. चौकशीत त्याने कबूल केले की, भीक मागून जमा झालेले पैसे तो सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांना व्याजाने देतो. तो दररोज किंवा साप्ताहिक तत्त्वावर कर्ज वाटप करायचा आणि रोजचे व्याज वसूल करण्यासाठी पुन्हा भिकाऱ्याच्या वेशात सराफा बाजारात फिरायचा.

 

इंदूरमध्ये ६,५०० भिकाऱ्यांचा सुळसुळाट

जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ पासून इंदूरला भिक्षावृत्तीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. सुरुवातीच्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ६,५०० भिकारी आढळले होते. त्यापैकी ४,५०० जणांचे समुपदेशन करून त्यांना या कामापासून परावृत्त करण्यात आले आहे, तर १६०० जणांना सेवाधाम आश्रमात पाठवण्यात आले आहे. मांगीलालसारख्या व्यावसायिक भिकाऱ्यांमुळे गरजू आणि खऱ्या भिकाऱ्यांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी मलिन होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अशा टोळ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button