‘९ ऑगस्ट’ हा ऑगस्ट क्रांती दिवस
१९४२ साली कॉग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलन सुरु केले.गांधीनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात ‘करो या मरो’ चे आवाहन केले.भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला ‘ऑगस्ट चळवळ’ किंवा ‘ऑगस्ट क्रांती’ असेही म्हणतात.९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया कॉग्रेस कमिटीचे नेतृत्व केले.हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘९ ऑगस्ट’ हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.स्वातंत्रवीरांना श्रद्धांजली वाहून तसेच देश एकतेची भाषणे आणि इतर कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
भारत सोडा आंदोलनाच्या सुरुवातीला महात्मा गांधीनी गोवालीया टॅक येथून भाषण दिल्याने या मैदानाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी देशाला आवाहन करण्यासाठी महात्मा गांधी आणि कॉग्रेसचे इतर नेते ८ आॉगस्ट १९४२ आणि ९ आॉगस्ट १९४२ रोजी या ठिकाणी एकत्र जमले होते.या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या स्मारकाची उभारणी या मैदानावर केली गेली आहे.मध्य मुंबईमध्ये स्थित असलेले गोवालिया मैदान हे गाई आणि इतर प्राणी स्वच्छ करण्यासाठी वापरले जायचे.’गो’ म्हणजे गाई आणि ‘वाला’ म्हणजे त्यांचा मालक ,म्हणून याचे नाव गोवालिया असे पडले.
सध्या याचे रुपांतर पाच विभागणी असलेल्या मोठ्या मैदानात झाले आहे.एक विभाग हा शहीदांच्या स्मारकांचा आहे.सगळ्यात मोठा भाग म्हणजे खुले खेळाचे मैदान त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांसाठी गार्डन आणि लहान मुलांसाठी छोटेसे खेळाचे मैदान आहे.गांधी ज्या मणीभवन चा वापर मुख्यालय म्हणून करत होते त्यापासून जवळच हे मैदान आहे.हे मैदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तसेच एका महत्वाच्या ऐतिहासिक क्षणाचा भाग आहे