महाराष्ट्रात थर्टी फस्ट साजरा होत असताना कोकणातील ‘हे’ संपूर्ण गाव रातोरात रिकामं झाले; घर, दार सगळं आहे तसचं सोडून ग्रामस्थ गुराढोरांसह गावाबाहेर गेले, कारण काय?

महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरात थर्टी फस्ट साजरा होत असताना कोकणात एक विचित्र प्रकार घडला. महाराष्ट्रात थर्टी फस्ट साजरा होत असताना कोकणातील ‘हे’ संपूर्ण गाव रातोरात रिकामं झाले; घर, दार सगळं आहे तसचं सोडून ग्रामस्थ गुराढोरांसह गावाबाहेर गेले.
संपूर्ण गावात शुकशुकाट झाला. या मागे वर्षानुवर्षे चावत आलेली जुनी प्रथा आहे.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या सिंधुदुर्गमधील शिराळे गावपळणला 31 डिसेंबर 2025 बुधवारी सायंकाळपासून सुरुवात झाली आहे. या गावात सध्या गावपळण साजरी केली जातेय. गावपळण म्हणजे अख्खं गाव एकत्रितपणे तीन ते चार दिवस वेशीबाहेर निघून जातं. तीन ते चार दिवस पुरणारं अन्नधान्य, कपडे, भांडी, पाळीव प्राण्यांसह अख्खं गाव वेशीबाहेर पडतं आणि नवीन संसार थाटतं. जुन्या रिवाजाप्रमाणे ग्रामदेवतेला कौल लावल्यानंतर गावपळणीचा दिवस ठरतो आणि अख्खं गाव गायब होतं.. पूर्वीच्या काळात साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी अशाप्रकारे गावपळण केली जायची असं गावक-यांचं म्हणणं आहे.
गावपळण प्रथेसाठी संपूर्ण शिराळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे चारशे ते साडेचारशे वर्षांची परंपरा असलेल्या या अनोख्या गावपळणसाठी शिराळेवासीयांनी जोरदार तयारी केली आहे. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळण ही ऐतिहासिक परंपरा आहे. गेली अनेक वर्षे येथील ग्रामस्थ ही परंपरा जपत आहे.या गावपळणीच्यावेळी संपूर्ण गाव वेशीबाहेर येतो. या गावपळणीला सुरुवात झाली आहे. गुराढोरांसह गावाबाहेर येणाऱ्या ग्रामस्थांची गेले दोन दिवस सडुरे येथील गावपत्थर परिसरात लगबग दिसून येत आहे. राहुट्या उभारणे, परिसराची साफसफाई करणे, गुराढोरांसाठी तात्पुरते गोठे उभारणे, तसेच राहुट्यांमधील सारवणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
गावातून स्थलांतर केल्यानंतर पुन्हा गावात ये-जा नसल्यामुळे चार-पाच दिवस पुरेल इतके अन्नधान्य, भांडीकुंडी व आवश्यक साहित्याची बांधाबांधही गावकऱ्यांकडून केली जात आहे.उद्या सायंकाळी शिराळे गावातील सर्व ग्रामस्थ गुरेढोरांसह व अन्य पाळीव पशुपक्ष्यांसह सडुरे येथील राहुट्यांमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस सर्व गावकरी एकाच ठिकाणी वास्तव्यास राहणार आहेत. या कालावधीत प्राथमिक शाळाही त्याच ठिकाणी भरते, तसेच गावात जाणारी बससुद्धा याच ठिकाणी थांबते, हे या गावपळणचे वैशिष्ट्य आहे.
शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही गावपळण आज केवळ परंपरा न राहता गावकऱ्यांचा एक मोठा उत्सव बनली आहे. संपूर्ण गाव एकत्र येऊन नांदत असल्याने परिसरात आनंद, आपुलकी आणि एकोप्याचे वातावरण अनुभवायला मिळते. मुंबईसह राज्यातील विविध भागांत नोकरी-धंद्यानिमित्त गेलेली मंडळीही आवर्जून या कालावधीत गावपळणसाठी आपल्या मातीशी नातं जोडण्यासाठी गावात परततात.परंपरा, संस्कृती आणि एकात्मतेचा अनोखा संगम असलेली शिराळे गावपळण यंदाही उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणार आहे.
या गावपळणीसाठी वयोवृद्धांसह लहान मुलं, चाकरमानी, माहेरवाशिणी मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. तीन दिवस, तीन रात्री अख्खा गाव वेशीबाहेर असतो. भजन, कीर्तन, फुगड्यांसारखे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. वेशीबाहेर राहुट्यांमध्ये संसार थाटला जातो आणि चुलीवर जेवण केलं जातं. पूर्वीच्या काळात साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी अशाप्रकारे गावपळण केली जायची असं गावक-यांचं म्हणणं आहे.









