Video : चीनमध्ये निवासी इमारतीला भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू…

चीनमध्ये भीषण दुर्घटना घडली. दक्षिण चीनमधील एका निवासी इमारतीला आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक अग्निशमन विभागाने बुधवारी (10 डिसेंबर) या घटनेबाबत एक निवेदन जारी केले.
ग्वांगडोंग प्रांतातील शान्ताऊ शहरामध्ये ही चार मजली इमारतीला भीषण आग लागली.
व्हिडिओ येथे पहा !
आगीच्या कारणांची चौकशी सुरु
चाओनान जिल्हा अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीला आग लागली, ती सिमेंट-काँक्रीटची इमारत होती. या आगीमुळे सुमारे 150 चौरस मीटर परिसराला मोठा फटका बसला. पथकाने पुढे सांगितले, आग लागण्याच्या कारणांची चौकशी केली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याची सखोल चौकशी सध्या सुरु आहे.
मृतांच्या संख्येत वाढ
बुधवारी सकाळी आलेल्या प्राथमिक अहवालांमध्ये 8 लोकांचा मृत्यू झाल्याचे आणि 4 जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. मात्र, सरकारी माध्यमांचे आऊटलेट शिन्हुआने नंतर माहिती दिली की, या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरु आहेत.
हाँगकाँगच्या घटनेनंतर चीनमध्ये मोहीम
ही दुर्घटना अशा वेळी घडली, जेव्हा चीनने नुकताच उंच इमारतींमधील आगीच्या धोक्यांविरोधात एक विशेष मोहीम सुरु केली आहे. मागील महिन्यात ग्वांगडोंगला लागून असलेल्या हाँगकाँगमध्ये अनेक उंच निवासी इमारतींना भीषण आग लागली, ज्यामध्ये 160 लोकांचा मृत्यू झाला होता. हाँगकाँगमध्ये लागलेल्या आगीनंतर चीन सरकारने उंच इमारतींमध्ये आगीच्या धोक्यांविरोधात एक देशव्यापी मोहीम सुरु केली होती. अशा परिस्थितीत शान्ताऊमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे चीनमधील सुरक्षा व्यवस्थेवर आणि नियमांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.











