प्रियकराचा मेसेज “धरणावर भेटायला ये”, ‘ती’ही तातडीने भेटायला गेली अन् दोघांनीही धरणात घेतली उडी; नेमकं घडल काय?

कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील धरणामध्ये तरुण आणि तरुणीने आत्महत्या केली. मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघांचेही मृतदेह धरणपात्रात आढळून आल्यानंतर हा प्रकार पुढे आला.
सोहम कृष्णा चिंदरकर (वय २१, रा. कुंभारवाडी कलमठ) व ईश्वरी दीपक राणे (१८, रा. बांधकरवाडी) अशी त्यांची नावे आहेत. सोहमचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्यानंतर काल (ता. ९) सायंकाळी उशिरा त्याने ईश्वरीला घेऊन तरंदळे धरण गाठले आणि दोघांनीही पाण्यात उडी मारल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सोहम याचा मोबाईल काल (ता. ९) दुपारी एकच्या सुमारास हरवला. त्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. घरी आल्यावर मोबाईल हरवल्याचे तीव्र दु:ख झाल्याची बाब त्याने कुटुंबीयांना सांगितली होती.
दुपारनंतर सोहम याने आपल्या आईच्या मोबाईलवरून ईश्वरीशी संवाद साधला होता. तसेच सोहम याने आपल्या आईच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संदेशही पाठवला होता. सायंकाळी सातच्या सुमारास सोहम आपल्या काकाची दुचाकी घेऊन हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी जातो, असे सांगून घरातून कणकवलीच्या दिशेने निघून गेला. त्याच सुमारास ईश्वरीने आपण औषधे आणण्यासाठी मेडिकलमध्ये जाते, असे आपल्या कुटुंबीयांना सांगून बांधकरवाडी येथून घराबाहेर पडली.
सोहम आणि ईश्वरी सायंकाळी उशिरापर्यंत आपापल्या घरी पोचले नाहीत. त्यामुळे दोघांच्या घरच्या मंडळींनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. यात रात्री नऊच्या सुमारास ईश्वरी हिचे कुटुंबीय तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी त्याबाबतची माहिती पोलिसांनाही दिली होती.
दरम्यान, सोहम याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्याचा कणकवली शहरात ठिकठिकाणी शोध घेत होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा सापडला नव्हता. रात्री अकराच्या सुमारास सोहम याच्या आईच्या मोबाईल व्हॉट्सॲपमध्ये ईश्वरी हिच्या मोबाईल क्रमांकावर एक संदेश पाठविल्याची बाब सोहमचे काका मिलिंद यांच्या लक्षात आली. ‘तरंदळे धरणावर भेटू या’ असा उल्लेख त्या मेसेजमध्ये होता. त्यामुळे सोहम यांचे कुटुंबीय आणि नातेवाइकांनी तातडीने वाहने घेऊन तरंदळे धरण गाठले. त्यावेळी तरंदळे धरण परिसरात सोहम याने आपल्यासोबत आणलेली दुचाकी आढळून आली; मात्र, सोहम तेथे नव्हता. त्यामुळे रात्री साडेअकरापासून तरंदळे धरणाच्या पात्रात टॉर्चचे झोत टाकून सोहम याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
तसेच याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर कणकवली पोलिस निरीक्षक तेजस नलवडे, सहायक निरीक्षक गजानन पडळकर, हवालदार सुदेश तांबे, श्रीमती नांदोसकर घटनास्थळी दाखल झाले. याखेरीज कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, तरंदळे सरपंच सुशील यांच्यासह कलमठ आणि तरंदळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
तरंदळे धरणाचे पात्र मोठे आहे. त्यामुळे तब्बल दोन तास पोलिसांसह कलमठ आणि तरंदळे येथील ग्रामस्थांकडून धरणपात्रात दोघांचा शोध सुरू होता. अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास धरणाच्या एका टोकाला असलेल्या पाणी ओव्हरफ्लो असणाऱ्या भागात प्रथम एका तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानंतर तेथून काही अंतरावर सोहम याचाही मृतदेह आढळला. धरण पात्रातील दोन्ही मृतदेह पहाटे चारच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. त्यावेळी एक मृतदेह सोहम याचा, तर दुसरा ईश्वरीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ईश्वरी हिच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली.
ईश्वरी हिचे कुटुंबीय तरंदळे धरण परिसरात दाखल झाले. त्यांनी ईश्वरीच्या मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पाचच्या सुमारास दोन्ही मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले. विच्छेदन अहवालात दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सोहम आणि त्या ईश्वरीने धरण पात्रात एकाच वेळी उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला.
दरम्यान, या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, याबाबतची वर्दी सोहम याचे काका मिलिंद राजाराम चिंदरकर (५०, रा. कुंभारवाडी कलमठ) यांनी दिली. ईश्वरीच्या मागे आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सोहमच्या मागे आई आणि दोन काका, काकी असा परिवार आहे.
सोहम चिंदरकर कणकवलीतील एका महाविद्यालयात तिसऱ्या वर्षामध्ये शिकत होता, तर ईश्वरी कनेडीत बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. दोघांमधील प्रेमसंबंधांची माहिती घरच्या मंडळींना होती. दोन्ही कुटुंबाकडून त्यांना कधी विरोधही झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय, हे गूढ कायम राहिले आहे.
सोहमचा मोबाईल हरवला होता. त्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची बाब प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. त्यामुळे सोहमच्या मोबाईलचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत मोबाईल सापडला नव्हता. तो सापडल्यानंतर आत्महत्येमागील गूढ उकलले जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.











