Video: पाकिस्तानच्या संसदेत गाढवाचा धमाकूळ; व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये अचानक एक गाढव घुसल्याची घटना घडली आहे. हे गाढव शांततेत फिरत नव्हतं तर पळत सुटलं होतं. त्यामुळे काही फाईल्स अस्ताव्यस्त झाल्या, एक खासदार खुर्चीवरुन पडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडिओ येथे पहा !
हा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियात या घटनेची चांगलीच टर उडवली.
संसदेच्या कामकाजादरम्यान ही घटना घडली. संसदेच्या सिनेट सभागृहाच्या मध्याभागी हे गाढव घुसलं होतं. काही वेळासाठी सभागृहात एकच गोंधळ उडाला. अनेक खासदार पोट धरुन हसत होते. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. सिनेटचे अध्यक्ष युसूफ रझा गिलानी यांनीही या प्रकारानंतर मार्मिक टिप्पणी केली.
युसूफ रझा गिलानी म्हणाले, “प्राण्यांनाही आपल्या कायद्यांबद्दल काहीतरी बोलायचे आहे,” या त्यांच्या विधानावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वातावरण अधिक हलकेफुलके झाले. हे गाढव संसदेच्या आवारात नेमके कसे घुसले, याची चौकशी सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सुरु आहे.
नेटीझन्सनी या घटनेमुळे पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली. एका युजरने म्हटलं, ‘गाढवांच्या संसदेत आणखी एक गाढव आलं’ तर दुसऱ्या एका युजरने ‘तो आपल्या लोकांशी बोलण्यासाठी आला होता, कुटुंबाला भेटायला आला होता,’ असे म्हटलं. एकाने तर ‘त्याची सीट कोणीतरी घेतली आहे, म्हणून तो रागावला आहे,’ अशी टिपण्णी केली.
पाकिस्तानच्या संसदेत अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. याआधी २०२३ मध्ये एक भटका कुत्रा संसदेच्या आवारात शिरला होता. देशाच्या सर्वात महत्त्वाच्या इमारतीमध्ये अशा पद्धतीने सुरक्षेची बोंब असेल तर जगभरात हसू होणारच. हा व्हिडीओ सोशल मीडियात भलातच व्हायरल झाला आहे.











