निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका…

विनोदी शैलीतील किर्तनाच्या माध्यमामधून समाजप्रबोधन करणारे हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर हे सर्वपरिचित आहेत. महाराष्ट्रात त्यांना मानणारा फार मोठा वर्ग देखील दिसून येतो.
त्यांच्या किर्तनालाही प्रचंड गर्दी असते. शिवाय, त्यांच्या किर्तनाचे व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होत असतात. यामुळे निवृत्ती महाराज हे एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. समाज प्रबोधनासाठी ते विनोदात्मक शैलीतून परखड टीका करताना कायम दिसतात.
मात्र आता याच निवृत्ती महाराज इंदुरीकरांवर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी जोरदार टीका केली आहे. याला कारण, निवृत्ती महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात झालेला खर्च असल्याचे समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा संगमनेर येथे पार पडला. मात्र या साखरपुड्याच लाखो रुपयांचा खर्च झाल्याचे समोर येत आहे. शिवाय, साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आले आहेत. यावरूनच आता मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी निवृत्ती महाराज इंदुरीकरांवर टीका केली आहे. दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला, असं तळेकर यांनी म्हटलं असल्याचं समोर आलं आहे.
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे थाटामाटात पार पडला. अर्थातच या सोहळ्याला अनेक राजकीय पुढाऱ्यांसह बड्या मंडळीनी हजेरी लावली होती. त्यामुळे या साखरपुड्याच्य काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आल्या आहेत.
आपल्या किर्तनातून समाजाला साधेपणाची शिकवण देणाऱ्या आणि विवाह सोहळ्यांवर अमाप पैसा खर्च करू नका, असे आवाहन करणाऱ्या निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी स्वत:च्या लेकीच्याच साखरपुड्यात मोठा खर्च केल्याचे समोर आल्यानंतर, त्यांनी हा कार्यक्रम साधेपणाने का नाही केला? असा प्रश्न मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी उपस्थित केला आहे.
सुभाष तळेकर नेमकं काय म्हणाले? –
”बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते, तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण एक बोलता परंतु त्याचा जीवनात अवलंब करत नाही, याचा खेद वारकरी सांप्रदायाला आहे. निवृत्ती महाराज त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागले असते तर सांप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता.” असेही सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.











